Wed, Nov 14, 2018 12:55होमपेज › Satara › कोसळताहेत सरीवर सरी; कास लय भारी... 

कोसळताहेत सरीवर सरी; कास लय भारी... 

Published On: Jul 06 2018 1:35AM | Last Updated: Jul 05 2018 8:20PMसातारा : प्रतिनिधी    

सातारा जिल्ह्यात निसर्गसौंदर्याने नटलेली अनेक ठिकाणे आहेत. त्यामध्ये जागतिक वारसास्थळ म्हणून गौरवलेल्या कास पठाराची नजाकत काही औरच आहे. सह्याद्रिच्या पर्वतरांगांमध्ये विसावलेला कासचा हा परिसर म्हणजे स्वप्नवत सृष्टीच. गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाँधार पावसाने कासच्या सौंदर्याला आणखी चार चाँद लागले आहेत. दाट धुक्यांनी लपेटलेल्या कासला अल्हाददायक अन् खट्याळ वार्‍याची रंगत लाभली आहे. अशातच वारंवार कोसळत असलेल्या सरीवर सरींनी कास लय भारी वाटू लागले आहे.

अवघं पठार ओलं चिंब झालं असून जनजीवन पुरतं भिजून गेलं आहे. डोंगर रांगांनी हिरवा शालू परिधान केला असून कडेकपारीतून कोसळणारे छोटे-मोठे धबधबे पर्यटक व निसर्गप्रेमींना वेड लावत आहेत. पठारावरील रस्तेही जलमय झाले असून स्थानिकांनाही या पावसाने भंडावून सोडले आहे. अंगावरील जलधारांचा वर्षाव, चिखलातून तुडवत जाणारी वाट अशा काही बाबी स्थानिकांच्या अंगेवळणी पडल्या आहेत. पठारावरील कासचं ठिकठिकाणी भुरळ पाडणारं हे रूपडं कॅमेर्‍यात कैद करण्यात आले आहे.