Fri, Mar 22, 2019 05:32
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › एसटीत मोबाईलद्वारे महिलेचे चित्रीकरण

एसटीत मोबाईलद्वारे महिलेचे चित्रीकरण

Published On: Feb 14 2018 2:56AM | Last Updated: Feb 13 2018 11:12PMकराड : प्रतिनिधी

एसटीमध्ये पाठीमागे बसून महिलेचे मोबाईल कॅमेर्‍याद्वारेे चित्रीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवार, दि. 13 रोजी दुपारी कोल्हापूर ते कराडदरम्यान संबंधिताचा हा प्रकार सुरू होता. ही बाब एसटीतील काही युवकांच्या लक्षात येताच त्यांनी महिला वाहकाच्या मदतीने इचलकरंजीतील एकास कराड पोलिसांच्या ताब्यात दिले. उदय रामचंद्र चव्हाण (वय 56, रा. जवाहरनगर, इचलकरंजी, जि. कोल्हापूर) असे मोबाईल कॅमेर्‍याद्वारे महिलेचे चित्रीकरण करणार्‍याचे नाव आहे.  कोल्हापूर-भोर एसटी कोल्हापूरमधून कराडकडे येत होती. नातेवाईकासह बसलेल्या एका महिलेच्या पाठीमागील सिटवर उदय चव्हाण बसला होता.

प्रवासात समोरील सिटवर बसलेल्या  महिलेची झोप लागल्याचे लक्षात  येताच उदय चव्हाण याने मोबाईलद्वारे समोर बसलेल्या महिलेचे चित्रीकरण सुरु केले. चित्रीकरण करत असताना त्याने मोबाईलवर रुमाल झाकला होता. बराचवेळ त्याची वेगवेगळ्यापध्दतीने हालचाल होत असल्याने व त्याच्या हातात काहीतरी असल्याची शक्यता आल्याने त्याच्याही पाठीमागे बसलेल्या युवकांना त्याचा संशय आला. त्यामुळे त्यातील एकजण आपली सीट सोडून उदय चव्हाण याची हालचाल स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी जाऊन बसले. समोर बसलेल्या महिलेचे चित्रीकरण करत असल्याचे लक्षात येताच संबंधित युवकांने आपल्याकडील मोबाईलमध्ये तो करत असलेल्या कृत्याचा फोटो काढला.

त्यानंतर संबंधित युवकाने ही बाब महिला वाहकांच्या लक्षात आणून दिली. तसेच त्याने संबंधित महिलेच्या नातेवाईकांनही ही बाब सांगितली. त्यामुळे पेठ नाका ते कासेगाव दरम्यान, हा सर्व प्रकार समोर आल्याने त्यांनी कराड पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोल्हापूर नाक्यावर आल्यानंतर वाहतुक शाखेचे पोलिस उभा असलेल्या ठिकाणी चालकांने एसटी थांबवली. वाहतूक शाखेच्या पोलिसाला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेत एसटीसह पोलिस ठाण्यात आणले. याबाबत संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून उदय चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशीरापर्यंत सुरु होती.