Wed, May 27, 2020 07:48होमपेज › Satara › कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय; जिल्ह्यात चार ठिकाणी उमेदवार देणार 

कराड उत्तर ‘स्वाभिमानी’ लढवणार

Published On: Jul 19 2019 2:18AM | Last Updated: Jul 18 2019 10:36PM
कराड : प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण बैठक पुणे येथे पार पडली. संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीत स्वाभिमानी स्वबळावर 46 जागा लढवणार असल्याचे ठरले. सातारा जिल्ह्यातील कराड उत्तरसह चार जागा लढविणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिली. 

यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफळे, प्रा. जालिंदर पाटील, प. महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बालवडकर प्रमुख उपस्थित होते.
सचिन नलवडे म्हणाले, स्वाभिमानी विधान सभेसाठी सातारा जिल्ह्यातील एकूण चार जागा लढवार आहे. यामध्ये जिल्ह्यातील कराड उत्तर, माण- खटाव, फलटण, कोरेगांव या मतदार संघाचा समावेश आहे.

मागील विधानसभेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर, कोरेगांव व फलटण या तीन मतदार संघात निवडणूक लढवली होती. यावेळी कराड उत्तर मधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला 45  हजाराच्या आसपास मते मिळाली होती. स्वाभिमानीचे जिल्ह्याध्यक्ष सचिन नलवडे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडी धर्म पाळून श्री.छ. खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी मसूर येथे शेतकरी मेळावा घेतला होता.  गेली सात वर्ष स्वाभिमानीच्या माध्यमातून कराड तालुक्यामध्ये ऊस दर, दूध दर, धरणग्रस्त शेतकरी, रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी, वीज प्रश्न,पाणी प्रश्नावर आवाज उठवला जात आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटना येणारी विधानसभा ही शेतकरी, कष्टकरी मजूर, कामगार व बेरोजगार युवक यांच्या प्रश्नावर लढवणार आहे.
शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, शेतीला पाणी अखंड वीज, शेतकरी युवकांना रोजगार आदी प्रश्न आक्रमकपणे सोडविण्यासाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटना लढत आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर विधानसभा लढविणार आहे. शेतकरी आम्हाला साथ देतील असे  सचिन नलवडे यांनी सांगितले.