Mon, Jul 15, 2019 23:38होमपेज › Satara › कराडात दगडफेक; वाहनांची मोडतोड

कराडात दगडफेक; वाहनांची मोडतोड

Published On: Jan 03 2018 1:18AM | Last Updated: Jan 02 2018 11:18PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आक्रमक झालेल्या जमावाने अचानकपणे दुकाने, हॉटेल वाहनांची तोडफोड केली. जमावाने केलेल्या दगडफेकीत सुमारे पंधरा वाहनांची मोडतोड झाली असून, अनेक दुकानांच्या काचा फोडल्या आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोठा जमाव जमल्याने पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली. दरम्यान, ढेबेवाडी फाट्यावर टायर पेटविण्याचा प्रयत्न केला. यामुळे कराड शहर व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

भीमा कोरेगाव येथे सोमवारी घडलेल्या घटनेचे पडसाद मंगळवारी (दि. 2) दुपारी एकच्या सुमारास कराडात उमटले. घटनेच्या निषेध करण्यासाठी जमावाने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.  प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांना निवेदन देऊन बाहेर पडलेला जमाव अचानकपणे आक्रमक झाला. जोरजोरात घोषणा देत जमाव बसस्थानकात गेला व त्यांनी एसटी फेर्‍या बंद करण्यास सांगितले. त्यानंतर जमाव बसस्थानकासमोरील रस्त्यावर आला. यावेळी त्यांनी दुकाने बंद करण्यास सांगत हॉटेलसह अन्य दुकानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. आक्रमक झालेला जमाव उघड्या दुकानांवर दगडफेक करत दुकाने बंद करण्यास सांगत होता. यावेळी काही दुचाकींचीही जमावाने मोडतोड केली. 

जमाव बसस्थानकासमोरून विजय दिवस चौकात आल्यानंतर जमावातील काहींनी तेथे उभा असलेल्या रिक्षांवरही दगडफेक केली. त्यामध्ये तीन रिक्षांच्या काचा फुटल्या   असून काही दुचाकींचे नुकसान झाले आहे. तेथून पुढे उपजिल्हा रूग्णालयाच्या दिशेने जमाव जात असताना काही इमारतींवरही काहींनी दगडफेक केली. तसेच रस्त्याकडेला थांबलेल्या वाहनांवर तसेच दुकानांवर दगडफेक करण्यात आली. त्यामध्ये काही दुकानांच्या तसेच वाहनांच्याही काचा फुटल्या. जमाव आंबेडकर चौकात आल्यानंतर तेथेच संतप्त  जमावाने ठिय्या मांडला.  

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. नंतर  जमाव पांगला. या घटनेमुळे शहरात सायंकाळपर्यंत तणावाचे वातावरण होते. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ढेबेवाडी फाट्यावर काहींनी टायर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिस घटनास्थळी पोहचल्यामुळे आंदोलनकर्ते तेथून निघून गेले. या घटनेमुळे कराड व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.