Fri, Jul 19, 2019 19:56होमपेज › Satara › कदम साहेब, या भूमीत पुन्हा जन्माला या..!

कदम साहेब, या भूमीत पुन्हा जन्माला या..!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

हजारो कुटुंब उभे करणारे आणि सामान्य माणसाला आधार वाटणारे असे स्व. डॉ. पतंगराव कदम यांचे नेतृत्व होते. त्यांच्या अवचीत जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. कदम साहेब या भूमीत तुम्ही पुन्हा जन्माला या, अशा भावपूर्ण शब्दात मान्यवरांनी स्व. डॉ. पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहिली. येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सदनमध्ये शुक्रवारी सर्वपक्षीय शोकसभा झाली. यावेळी मान्यवरांनी स्व. डॉ. कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

आ. पृथ्वीराज चव्हाण शोक व्यक्त करताना म्हणाले, डॉ. कदम हे मंत्रीमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य होते. पण मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी मला साथ दिली. अनेक धाडसी व सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना त्यांनी केलेले प्रयत्न कधीच विसरता येणार नाहीत. भारती विद्यापीठ व रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले काम अविस्मरणीय असे आहे. काँग्रेसचा झेंडा त्यांनी खांद्यावर घेतला, तो शेवटच्या श्‍वासापर्यंत खाली ठेवला नाही. त्यांच्या निधनाने प. महाराष्ट्राचे  फार मोठे नुकसान झाले आहे. ते आपल्यातून निघून गेले यावर आजही विश्‍वास बसत नाही. 

आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांनी प्रत्येक मतदार संघाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. दुष्काळी भागाचे त्यांनी नंदनवन केले. त्यांच्या निधनाने सांगली जिल्ह्याचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. आ. शंभूराज देसाई म्हणाले, सकारात्मक व जनहिताच्या भूमिका घेणारा नेता म्हणजे डॉ. पतंगराव कदम. त्यांनी सामान्य व गोरगरीब जनतेसाठी केलेले काम राज्यासाठी आदर्शवत असेच आहे.

आ. आनंदराव पाटील म्हणाले, गोरगरीब जनतेचा पोशिंदा गेला आहे. शुन्यातून विश्‍व निर्माण करण्याची किमया या दृष्ट्या नेत्याने साधली आहे. त्यांच्या जाण्याचे माझ्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांचा आधारच गेला आहे. माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, डॉ.पतंगराव कदम हे चालते बोलते विद्यापीठ होते. शिक्षण, सहकार, पुनर्वसन आदी सर्वच क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. 

कराड अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी म्हणाले, डॉ. पतंगराव कदम हे उत्तंग व्यक्तीमत्वाचे नेते होते. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राचे कधी न भरून येणारे नुकसान झाले आहे. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील म्हणाले, डॉ.कदम यांना एवढ्या लवकर श्रध्दांजली वाहण्याची वेळ येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. असामान्य कर्तृत्व असणारा हा नेता आपल्यातून निघून गेल्याचे मोठे दुःख आहे. 

दै. पुढारीचे कराड कार्यालय प्रमुख सतीश मोरे म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांचे पत्रकारांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. पत्रकारांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीची त्यांच्याकडून तात्काळ अंमलबजावणी व्हायची. सामान्यांना आपलेसे करणारा मोठ्या मनाचा हा नेता आपल्यातून निघून गेल्याचे दुःख आहे. बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील म्हणाले, डॉ. कदम हे शेतकर्‍यांचे नेते होते. शेतकर्‍यांच्या मुलांचे शिक्षण असो की नोकरीचा प्रश्‍न त्यांनी मोठ्या आत्मियतेने त्या प्रश्‍नांची सोडवणूक केली होती. आरपीआयचे आप्पासाहेब गायकवाड म्हणाले, बहूजन समाजाची सुख-दुःख जवळून पाहणारा हा नेता होता. 

यावेळी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष नगरसेवक  राजेंद्र यादव, लोकशाही आघाडीचे नेते नगरसेवक सौरभ पाटील,  नगरसेविका शारदा जाधव, देवराज पाटील, अ‍ॅड. संभाजी मोहिते, धनी कुलकर्णी, नगरसेवक सौरभ पाटील,  फारूख पटवेकर, प्रमोद सुकरे, जगदीश जगताप, शरद गाडे, पांडुरंग जाधव यांनी शोक व्यक्त केला. शोकसभेस मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. 
 

 

 

 

 

tags : Karad,news, tribute to Patangrao Kadam


  •