Fri, May 29, 2020 13:28होमपेज › Satara › कराड : तांबवेचा पूल कोसळला : दैनिक पुढारीने उठवला होता आवाज

कराड : तांबवेचा पूल कोसळला : दैनिक पुढारीने उठवला होता आवाज

Published On: Aug 14 2019 8:38AM | Last Updated: Aug 14 2019 8:38AM

तांबवे पूलकराड : प्रतिनिधी 

कराड-विटा मार्गावरील वाहतुकीसाठी २९ जुलै रोजी बंद करण्यात आला होता. जुना कृष्णा पूल कोसळल्याने कराड तालुक्यातील तांबवे येथील धोकादायक पुलाबाबतचे वृत्त दैनिक पुढारीने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर या वृत्ताची दखल घेत प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी बांधकाम विभागास तातडीने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या. दरम्यान, आज (ता.१४)  पहाटे हा पूल कोसळल्याचे समोर आले. सुमारे १५ दिवसांपूर्वी दैनिक पुढारीने तांबवे पुलाबाबत व्यक्त केलेली भिती खरी ठरली. दरम्यान पुलावरील वाहतूक बंद असल्याने अनर्थ टळला आहे.

कोयना नदीवरील तांबवे पूल वाहतुकीसाठी धोकादायक होता. दैनिक पुढारीने याबाबत आवाज उठवल्यानंतर सुमारे पाच वर्षापूर्वी झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही ही गोष्ट समोर आली होती. त्यानंतर काही महिने या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, नवीन पुलाचे रखडलेले काम आणि ग्रामस्थांना सुमारे आठ ते नऊ किलोमीटर जादा प्रवास करावा लागत होता. बांधकाम विभागाने पुलावर सुरूवातीला मध्यभागी रस्त्यावर लावलेले लोखंडी अँगल काढून जीव धोक्यात घालून तांबवेसह परिसरातील १२ गावातील लोक या पुलावरून २९ जुलै २०१९ पर्यंत प्रवास करत होते. 

तांबवेतील एका युवकाने २४ जुलै २०१९ रोजी धोकादायक पुलाचे आणि खचलेल्या पुलाच्या दगडी पिलरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. हाच धागा पकडून दैनिक पुढारीने २९ जुलैला धोकादायक पूल वाहतुकीसाठी बंद करण्याची आवश्यकता असल्याचे मांडले होते. त्यानंतर त्याच दिवशी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान, ३० जुलैनंतर मुसळधार पावसामुळे कोयना नदीला महापूर आल्याने हा पूल पाण्याखाली गेला होता. दोन दिवसांपूर्वी या पुलावरील पुराचे पाणी ओसरले होते. मात्र असे असले तरी कोयना नदी अजूनही दुथडी भरून वाहत असून बुधवारी रात्री पुलाचा गावाच्या बाजूचा पिलर कोसळून पुल पडला. त्यामुळेच जर पुलावरील वाहतूक सुरू असती तर अनर्थ टळला आहे.