Thu, Jul 18, 2019 16:51होमपेज › Satara › सुर्ली घाट अन् धोकादायक वाट

सुर्ली घाट अन् धोकादायक वाट

Published On: Feb 14 2018 2:56AM | Last Updated: Feb 13 2018 10:22PMकराड : अमोल चव्हाण

कराड-विटा राज्य मार्गावरील कराडपासून जवळच असलेल्या सुर्ली घाटातील वेडीवाकडी वळणे धोकादायक बनली आहेत. अनेक वळणांवरील संरक्षक कठड्यांची उंची कमी झाली असून अरुंद वळणांमुळे घाटात अपघांताचे प्रमाण वाढले आहे. घाटातील अरुंद रस्त्यामुळेच सोमवारी एसटी व ट्रॅक्टरचा अपघात झाला. यावेळी एसटी चालकाला दगडांचा 
मारही खावा लागला. घाटातील रस्त्याचे रुंदीकरण करून धोकादायक वळणे काढण्याबरोबरच संरक्षक कठड्यांची उंची वाढविण्याची मागणी प्रवाशी, वाहनधारकांमधून होत आहे.  
सुर्ली घाटात एखाद्या वळणावर दोन वाहने समोरासमोर आल्यास मोठी अडचण निर्माण होते.

त्यामुळे बर्‍याचवेळा वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूकीच कोंडी होत असते.  घाटात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरसह इतर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. काहीवेळेस ट्रॅक्टर चालक धोका पत्करून एकाचवेळेस उसाने भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन घाट उतरत असतात. त्यामुळे पाठीमागून येणार्‍या वाहनास त्याला ओव्हरटेक करत येत नाही. त्यामुळे सुमारे अर्धातास उसाने भरलेल्या ट्रॉलीच्या पाठीमागून इतर वाहनांचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे अनेकवेळा दोन्ही चालकांमध्ये बाचाबाची झाली असून वादावादीचे प्रकार घडले आहेत. 

काही दिवसापुर्वी घाटातील एका वळणावर उसाने भरलेली ट्रॉली पलटी झाल्यामुळे सुमारे दोन तास घाटातील वाहतूक ठप्प होती. तर दुसर्‍या एका घटनेत एका वळणावर मोटरसायकल व ट्रक यांच्यात धडक होऊन अपघात झाला होता. तर सोमवार दि. 12 रोजी सकाळच्या सुमारास एसटी व ट्रॅक्टरचा अपघात झाला होता. घाटातील रस्ता अरुंद असल्यामुळेच हा अपघात होऊन एसटी चालकाला दगडांचा मार खावा लागला होता.

जर रस्ता रुंद असता तर कदाचित ट्रॅक्टर चालकाला एसटी आडवी येत असताना आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर बाजूला घेता आला असता आणि अपघात टळला असता. पण तसे झाले नाही. केवळ रस्ता अरुंद व वळणे धोकादायक असल्यामुळेच अनेकवेळा असे छोटे-मोठे अपघात होत असतात. त्यामुळे अनेकजण जखमी होण्याबरोबरच वाहनांचेही मोठे नुकसान होत असते.