Fri, Jul 19, 2019 07:26होमपेज › Satara › कराड — चिपळूण रस्त्यावर वृक्षांची कत्तल

कराड — चिपळूण रस्त्यावर वृक्षांची कत्तल

Published On: Dec 12 2017 2:10AM | Last Updated: Dec 11 2017 10:36PM

बुकमार्क करा

पाटण  : गणेशचंद्र पिसाळ 

कराड चिपळूण या राज्यमार्गाचा राष्ट्रीय महामार्ग बनविण्यासाठी रस्त्याकडेच्या हजारो वृक्षांची राजरोसपणे कत्तल सुरू आहे. ज्या मायमाऊलींनी तळहाताच्या फोडाप्रमाणं जंगल राखली मात्र एखाद्या लाकडाच्या मोळीसाठी त्यांनाच कारावास देणारे वनखाते व फांदी तोडल्यावरही घंटानाद करणारे तथाकथित वृक्षप्रेमी आता गप्प का?  

भल्यामोठ्या कंपन्या आणि त्यांच्याशी झालेल्या अंतर्गत ‘तोड’ आणि ‘तडजोड’ हेच यातील मूळ असून यामुळे विकासाच्या नावाखाली निसर्गाचा र्‍हास करणार्‍यांचे फावले आहे. त्यामुळे आता याबाबत पर्यायी व्यवस्था होत नाही, तोपर्यंत यांचे मुळासकटचे तंत्र जनतेनेच हाणून पाडण्याची वेळ आली आहे. कराड चिपळूण या राज्यमार्गाचा राष्ट्रीय महामार्ग बनविण्यासाठी आता रस्ता रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. निश्‍चितच वाढती वाहनांची संख्या व रस्ते याबाबत विकासात्मक धोरण म्हणून ही बाब गरजेची आहे, मात्र त्याचवेळी विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या व पर्यावरणाचा र्‍हास करण्याचा ठेका या मंडळींना कोणी दिला या बाबी देखील तितक्याच महत्वाच्या व गंभीरही आहेत.  

यामध्ये रस्त्यावर असणारी एकूण झाडे, ती तोडल्यावर त्यातून आलेल्या लाकडे त्यांचा विनियोग व आर्थिक बाबी याबाबतीत निश्‍चितच संदिग्धता व अनेक संशयास्पद बाबी आहेतच. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळी वृक्षतोड होणार आहे त्यावेळी त्याच ज्यादापटीत वृक्षारोपण करणे बंधनकारक असतानाही याबाबत मात्र कमालीची शांतता व गोपनीयता बाळगण्याचे कारण व धोरणही स्पष्ट होत नाही. ज्यांनी ही झाडे, जंगले आपल्या पोराबाळांप्रमाणे राखली त्यांच्याच मानगुटीवर कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पश्‍चिम घाट व इको सेन्सिटिव्ह यातील कडक कायदे, जाचक अटी व निर्बंध लावून त्यांचे जगणेच अवघड करून टाकले आहे. चुकून जंगलातीलच न्हवे तर खाजगी क्षेत्रातील झाडांच्या फांद्या त्याच झाडाच्या वाढीसाठी शेवटण्याचे स्वातंत्र्यही संबंधितांना नाही, चुकून काही घडले की कायदा व कारावास दाखविणारे वनखाते व त्यांच्याच हो मध्ये हो मिसळणारे तथाकथित वृक्षप्रेमी येथे  दिवसाढवळ्या राजरोसपणे हजारो वृक्षांची डोळ्यादेखत कत्तल होताना गप्प का? हाच खरा संशयाचा व संशोधनाचा विषय बनला आहे. 

एकूणच या तोडी पाहता राजकारणी आपल्याला व पर्यायाने आपल्याच बगलबच्यांना या रस्त्याची कामे व त्यातूनच ठेकेदारांवर अवलंबून टक्केवारी यात गुरफटलेली आहेत. सामाजिक कार्यकर्ते किंवा वृक्षप्रेमी का गप्प आहेत?  हे त्यांचे त्यानांच माहीत. तर विकासाच्या नावाखाली प्रशासन ढिम्म आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे ज्यांनी आपल्या अनेक  पिढ्यांचे रक्षण केले त्याच वृक्षांवर विकासाच्या नावावर हे आर्थिक कसाइ कशाही कुर्‍हाडी, करवती चालवत आहेत, मुळासकट याच झाडांना उखडून टाकत असतानाही ही सामाजिक व्यवस्था जर डोळे मिटून शांतच बसणार असेल आणि याची संबंधित काहीच पर्यायी व्यवस्था करणार नसतील तर मग आपल्याच भावी पिढ्यांच्या पर्यावरण रक्षणावर आपणच कुर्‍हाडी चालवत तर नाहीना? याचाही विचार होणे ही काळाची गरज बनली आहे हे नक्कीच.