Wed, Aug 21, 2019 02:38होमपेज › Satara › कराडः गावठी पिस्टल जप्त; दोघांना अटक 

कराडः गावठी पिस्टल जप्त; दोघांना अटक 

Published On: Sep 09 2018 12:04PM | Last Updated: Sep 09 2018 12:04PMकराडः प्रतिनिधी 

कराड तालूका पोलिस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाने विंग तालुका कराड येथे छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल व दोन रिकाम्या पुंगळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. शनिवार दि. ८ रोजी रात्री अकरा वाजता पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत बाबासो रघुनाथ मोरे (रा. पाचुपतेवाडी, तुळसण, ता. कराड) या सराईत गुन्हेगारसह अरुण मारुती कणसे (रा. विंग ता. कराड) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. 

तालुका पोलिस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस हवालदार शशी काळे यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार विंग तालुका कराड येथे गावठी पिस्टल घेऊन दोघेजण येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ते सहकारी पोलिसांना बरोबर घेऊन कराड-ढेबेवाडी रस्त्यालगत विंग येथे असलेल्या हॉटेल परिसरात गेले. त्याचवेळी हॉटेल समोर बाबा मोरे व अरुण कणसे हे दोघे जण उभा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच ते दोघेही कावरेबावरे झाले व तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले. पोलिसांनी त्वरित त्यांना पकडले व त्यांची अंगझडती घेतली असता बाबा मोरे यांच्या खिशात एक गावठी पिस्टल तर अरुण कणसे याच्या खिशात दोन रिकाम्या पुंगळ्या पोलिसांना आढळून आल्या. पोलिसांनी पिस्टल व पुंगळ्या जप्त केले. तसेच बाबा मोरे व अरुण कणसे यांना ताब्यात घेऊन अटक केली. दरम्यान, बाबा मोरे हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्यावर अशाच स्वरूपाची कारवाई झाली होती. त्याच्यावर पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.