Fri, Apr 26, 2019 17:41होमपेज › Satara › निदान रेषा बंद करणारे कराडचे ‘चाचा’

निदान रेषा बंद करणारे कराडचे ‘चाचा’

Published On: Nov 30 2017 11:55PM | Last Updated: Nov 30 2017 11:47PM

बुकमार्क करा

कराड : चंद्रजित पाटील

कराडच्या लिबर्टी मजदूर मंडळाने गेल्या 70 वर्षांत अनेक गुणवान व संशोधक खेळाडू निर्माण केले आहे. यापैकी एक असलेल्या उस्मान महमंद बागवान यांनी आपल्या कल्पक नेतृत्वातून निदान रेषा बंद झाली. राज्याच्या कबड्डी इतिहासातही याची नोंद झाली आहे. केवळ कबड्डीच नव्हे, तर व्हॉलीबॉलमध्येही ज्ञानदेव जाधव, आकाराम पाटील, आप्पा पवार यासारखे गुणवान राष्ट्रीय खेळाडूही लिबर्टी मजदूर मंडळाने दिले आहेत. स्व. पी. डी. पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 65 व्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धांना शुक्रवारपासून (दि. 1 डिसेंबर)कराडमध्ये प्रारंभ होत आहे. 

लिबर्टी हुतूतू क्‍लब व बाल मजदूर मंडळ यांच्या एकीकरणातून 1954 साली लिबर्टी मजदूर मंडळाची स्थापना झाली होती. कबड्डी आणि त्यापाठोपाठ व्हॉलीबॉलसारखे खेळ या मंडळाचे प्रमुख खेळ होते. व्हॉलीबॉल व कबड्डी खेळांत कराडच्या लिबर्टीचे नाव अग्रक्रमांकावर होते.राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांत लिबर्टीने तयार केलेले खेळाडू कराडच्या नावलौकिकात भरच टाकत आहेत. व्हॉलीबॉलमध्ये ज्ञानदेव जाधव, आकाराम पाटील, आप्पा पवार यांनी कराडचे नाव देशपातळीवर नेऊन ठेवले होते. तर कबड्डीमध्ये बाळकृष्ण रेपाळ, अ‍ॅड. मानसिंगराव पाटील, विठ्ठल पाटील, शंकर बर्गे, स्व. धोंडिराम भोसले, स्व. मौला पठाण, ज्ञानू कांबळे यांनी कराडचा नावलौकिक वाढवला होता. 

त्याचबरोबर तानाजी पवार, उत्तम माने, विजय कुलकर्णी, नितीन मोटे, स्व. जयवंतराव जाधव यांनीही या नावलौकिकात भरच टाकली. अलीकडच्या काळात फिरोज पठाण, राजेंद्र जाधव, इंद्रजित पाटील, दादासोा पाटील, विशाल शिंदे, किरण गावणांग यांनीही आपल्या खेळाने कबड्डीत कराडच्या नावलौकिक कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. या खेळाडूंच्या यादीत उस्मान बागवान यांचे नाव घ्यावेच लागेल. त्यांनी सर्व वेळ कबड्डी व संशोधनासाठीच दिला होता.