Tue, Mar 19, 2019 15:34होमपेज › Satara › आठवडाभरात कराडकरांना कोयनेचे पाणी

आठवडाभरात कराडकरांना कोयनेचे पाणी

Published On: Feb 16 2018 1:49AM | Last Updated: Feb 15 2018 10:30PMकराड : प्रतिभा राजे

2009 पासून सुरू असणार्‍या कराडच्या 24 बाय 7 योजनेचे पाणी आता कराडकरांना अवघ्या आठवड्याभरात मिळणार आहे. टेंभू योजना व मलकापूरकडून येणारे पाणी यामुळे अशुध्द झालेल्या कृष्णा नदीच्या पाण्यातून कराडकरांची आता सुटका होणार असून कोयना नदीचे पाणी आता कराडकरांना चाखावयास मिळणार आहे. सध्या याठिकाणचे काम युध्दपातळीवर सुरू असून नगरपालिकेने या कामासाठी पूर्णपणे लक्ष दिले आहे. त्यासाठी कृष्णेकडून येणारे पाणी पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. गेल्या सुमारे 9 वर्षापासून सुरू असणार्‍या 24 बाय 7 योजनेच्या पाण्याचे घोडे वारंवार अडकत होते. त्यामुळे हे पाणी मिळण्याच्या आशा नागरिकांनी सोडून दिल्या होत्या.

सातत्याने या पाण्याबाबत नवनवीन कारणे सांगितली जात होती. त्यातही गेल्या वर्षभरापासून वारूंजी हद्दीतील जॅकवेलनजीकच्या मोटारीसाठीपर्यंत इलेक्ट्रीकल लाईन बसवण्यासाठी याठिकाणी हायवे क्रॉसिंगची सहमती प्राधिकरण कडून मिळत नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत होते. गेल्या 15 दिवसांपूर्वी परवानगी मिळाल्यानंतर जॅकवेलमध्ये मोटारी बसविण्याचे काम करण्यात आलेे. तेथे 11 केव्ही क्षमतेची वीज वाहिनी नेण्यासाठी महामार्ग क्रॉसिंग करून केबल टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता पाणी उचलून घेण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. 

या योजनेसाठी उचलण्यात येणारे पाणी कोयना नदी पात्रातून वारूंजी येथून उचलले जात आहे. तेथून पाणी उचलून शहरातील जलशुध्दीकरण केंद्रात आणण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.  त्यामुळे टेंभूमुळे निर्माण होणार्‍या पाण्याच्या फुगवट्यापेक्षा कमी अंतरावरून पाणी उचलले जाणार असल्याने दुर्गंधी व दुषित पाण्यापासून कराडकरांची सुटका होणार आहे. चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे नदीपासून थेट योजनेच्या टाकीत पाणी सोडण्यासाठी विद्युत कनेक्शनचे काम पुर्ण करणे गरजेचे होते. तसेच नदीप्रदूषण होऊ नये म्हणून वारूंजी हद्दीलगत कोयना नदीतील पाणी उचलून जलशुद्धीकरण केंद्रात टाकणे आवश्यक होते. त्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र ते वारूंजी येथील जॅकवेलच्या ठिकाणी वीज पुरवठा करण्यात आला आहे. काम पूर्ण होण्यासाठी  मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या देखरेखीखाली पालिकेच्या बांधकाम,ड्रेनेज विभाग, इलेक्ट्रीशियन विभाग तसेच बांधकाम विभाग कसोशिने परिश्रम घेत आहेत.