Fri, Jul 19, 2019 07:08होमपेज › Satara › शैक्षणिक परिसरामध्ये ओपन बारच्या हालचाली

शैक्षणिक परिसरामध्ये ओपन बारच्या हालचाली

Published On: Jan 17 2018 2:04AM | Last Updated: Jan 17 2018 2:04AM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी

शिक्षण हे पवित्र क्षेत्र. येथे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्काराचे धडे दिले जातात. पण या शिक्षण क्षेत्राला व्यसनाची झिंग चढविण्याचा ‘उद्योग’ कार्वे ता. कराड येथे काही महाभागांकडून सुरू आहे. कार्वे चौकीवरील भास्करराव थोरात हायस्कूलच्या काही अंतरावर बार व परमिट रूम सुरू करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या असून याला हायस्कूल प्रशासनासह ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. 

 दरम्यान याबाबतचे निवेदन जिल्हाधिकर्‍यांसह उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले आहे.  कराड- तासगाव रोडलगत हायस्कूलमध्ये 550 विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. येथून काही अंतरावर परमीटरूम सुरू करण्याच्या हालचाली आहेत. याचा विद्यार्थ्यांच्या बालमनावर विपरित परिणाम होणार आहे. एखादी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी परिसरात कोणतीही दारू अथवा नशीली पदार्थांचे उत्पादन अथवा विक्री होवू नये असे पत्र हायस्कूल प्रशासनाने दिले आहे. 

तर ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, परमीट रूम व बिअर बार कार्वे येथील भास्करराव थोरात विद्यालय परिसरात तसेच लहान मुलांची ये-जा  करणार्‍या रस्त्यालगत सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. शिक्षणावर व विद्यार्थ्यांवर याचा गंभीर परिणाम होणार आहे. त्यामुळे हे दारू दुकान येथे सुरू करण्यास आमचा तीव्र विरोध आहे.

प्रशासनाने आमच्या मागण्यांचा गांभिर्याने विचार करावा, अन्यथा या दारू दुकाना विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.  याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग, ना.  बावनकुळे,  माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना पाठविले आहे.