होमपेज › Satara › कराड ‘गँगवॉर’च्या दहशतीखाली

कराड ‘गँगवॉर’च्या दहशतीखाली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड ;  प्रतिनिधी

कासेगाव येथे दरोड्याच्या तयारीत असलेली कराडची गुन्हेगारी टोळी सापडल्यानंतर संपूर्ण कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दहा वर्षापूर्वीचे एकमेकांचे प्रतिस्पर्धी सल्या चेप्या आणि दिपक सोळवंडे यांच्या मुलांसह त्यांचे साथीदार गुन्हेगारी कृत्यांसाठी एकत्र आले आहेत. गेल्या आठवड्यात सल्या चेप्याच्या साथीदारांमध्येच उडालेला खटका आणि कोपर्डे परिसरात व्यावसायिकावर झालेला गोळीबाराचा प्रयत्न या सर्वामुळे कराड पुन्हा एकदा ‘गँगवॉर’च्या दहशतीखाली सापडले आहे.

कासेगाव येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात युवकांना पोलिसांनी गजाआड केले आहे. यात अडीच वर्षापूर्वी कारागृहात मृत्यू झालेल्या कुख्यात गुंड सल्या चेप्याच्या मुलासह दिपक सोळवंडे याचा मुलगा पवन याचाही समावेश आहे. 2005 साली दिपक सोळवंडे व सल्या चेप्या एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जायचे. त्याच्यात उडालेल्या खटक्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळेच तत्कालीन पोलिस निरीक्षक महादेव गावडे यांनी दोघांना जिल्ह्यातून तडीपार केले होते.

त्यानंतर सोळवंडे व सल्या चेप्या यांच्यातील मतभेद मिटले होते. दिपक सोळवंडे तडीपारीनंतर गुन्हेगारी जगतापासून आजवर लांबच राहिला आहे. मात्र या कालावधीत मंडई परिसरात बबलू मानेसह बाबर खानचा दुहेरी खून झाला. त्यानंतर सल्या चेप्याचा मुलगा आसिफसह साथीदाराविरूद्ध मोक्कातंर्गत कारवाई करण्यात आली होती. तसेच सल्या चेप्यावरील गोळीबार प्रकरणी प्रतिस्पर्धी टोळीही तुरूंगात होती. मात्र गेल्या काही महिन्यात एक एक संशयित तुरूंगाबाहेर येऊ लागला असून त्यामुळेच कराडवर गँगवॉरचे सावट पुन्हा एकदा गडद झाले आहे.

आता सल्या चेप्याचा मुलगा आसिफ शेख याच्याबरोबर गुन्हेगारी कृत्यात एकत्र असल्याचे पोलिस कारवाईतून समोर आले आहे. एकीकडे अशी स्थिती असताना सल्या चेप्यावरील गोळीबार प्रकरणातील काही संशयित जामिनावर सुटले आहेत. बबलू माने हत्येनंतर  ‘मोक्का’प्रकरणी तुरूंगात असलेला सल्याचा मुलगा आसिफसह त्याचे काही साथीदारही बाहेर आले आहेत. त्याचबरोबर एकेकाळी साथीदार म्हणून ओळखल्या जाणार्‍या काही जणांमध्ये गेल्या आठवड्यात कराडमध्ये जोरदार धुमश्‍चक्री उडाली होती. 

त्यापूर्वी युवराज साळवीसह त्याच्या साथीदारांनी खंडणीसाठी मसूर परिसरातील व्यावसायिकाला मारहाण करत त्याच्या दिशेने गोळीबार केल्याचा गुन्हाही कराड तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. त्यामुळेच कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. 
 


  •