Tue, Apr 23, 2019 13:48होमपेज › Satara › जुन्या कोयना पुलाला मिळणार नवसंजीवनी

जुन्या कोयना पुलाला मिळणार नवसंजीवनी

Published On: Feb 10 2018 1:39AM | Last Updated: Feb 09 2018 8:19PMकराड : प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना येथील ब्रिटीशकालीन जुन्या कोयना पुलाच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे या कामासाठी सुमारे 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या पुलाच्या मजबुतीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प विभागाच्यावतीने सुरु करण्यात आले  आहे. वर्षभरातच या पुलावरुन हलकी वाहतूक पुन्हा सुरु होणार आहे. 

कराडलगत कोयना नदीवर ब्रिटीश कालीन जुना कोयना पूल आहे. हा पूल शंभर वर्षांपुर्वीचा असून या पुलाचे आयुष्य संपले असून त्यावरील वाहतुक बंद करण्याबाबतचे पत्र इंग्लडमधून भारतात पाठविण्यात आल्याचे बोलले जाते. तेंव्हापासून या पुलावरुन होणार वाहतुक बंद करण्यात आली आहे. त्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला लोंखडी अँगल लावण्यात आले आहेत.

सध्या या पुलावरुन केवळ दुचाकींची वाहतुक सुरु आहे. कोयना नदीवरील जुना पूल वाहतुकीस बंद केल्यापासून कोल्हापूर नाक्यावर वाहतुकीची कोंडी वाढली आहे. त्यामुळे जुन्या कोयना पुलाची दुरूस्ती करून तो पूल वाहतुकीस खुला करावा अशी कराड व परिसरातील लोकांची गेली अनेक दिवसांपासूनची मागणी होती. याबाबत आ. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी कराड शहरातील विविध विकासकामांबरोबरच लोकांच्या मागणीचा विचार करून या पुलाच्या दुरूस्तीस मान्यता दिली होती. मात्र, तेंव्हापासून पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले नव्हते.

 त्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा पाठपुरावा सुरु होता. मात्र गत आठवड्यात या पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेनुसार या पूलाचे कामाचा आराखडा तयार करण्यात आला होता. यामध्ये दाखवलेले पुलातील दोष व दुरुस्त्या करण्यासाठी व पुलाचे मजबुतीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी चव्हाण यांनी केली होती. त्यानुसार शासनाच्या माध्यमातून पुलाच्या  मजबुतीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे.