कराड : प्रतिनिधी
शिवाजी स्टेडियमच्या दुरूस्तीचे टेंडर कोणी घ्यायचे यावरून कराड नगरपालिकेत शुक्रवारी सकाळी नगरसेवक व नगरसेविकेच्या समर्थकांमध्ये नगरपालिका आवारात राडा झाला. चाकू, तलवारी घेवून सुमारे तीन तास पालिकेत तुंबळ हाणामारी झाली.
उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांच्या केबिनमध्ये टेंडर नोटीसीबाबत सुरू असलेल्या चर्चेतून एक नगरसेवक आणि एका व नगरसेविकेचे दीर या दोघांची बाचाबाची होवून त्याचे रूपांतर मारामारीत झाले. यावेळी त्या नगरेवकाचे समर्थक आणि त्या नगरसेविकेच्या दीराचे समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. गेल्या दोन दिवसांपासून टेंडरचा हा वाद धुमसत होता. त्याचा आज भडका उडाला. त्यामुळे नगरपालिकेस रणसंग्रामाचे स्वरूप आले होते.
मारामारी, आरडाओरडा ऐकून पालिकेतील सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी धावत बाहेर आले. यानंतर मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी पोलिसांना फोन करून बोलावून वाद मिटवला. मुख्याधिकारी डांगे यांनी या घटनेस दुजोरा दिला आहे.