Thu, Apr 25, 2019 13:49होमपेज › Satara › कराडचा अर्थसंकल्प चर्चेविना मंजूर 

कराडचा अर्थसंकल्प चर्चेविना मंजूर 

Published On: Mar 01 2018 1:49AM | Last Updated: Feb 28 2018 10:59PMकराड : प्रतिनिधी 

अर्थसंकल्पावर कोणतीच चर्चा न करता अवघ्या 20 मिनिटांमध्ये कराड नगरपालिकेचा अर्थसंकल्प बुधवारी झालेल्या विशेष सभेत मंजूर करण्यात आला. 152 कोटी 37 लाखांचा हा अर्थसंकल्प असून रस्त्यांसाठी 1 कोटी, संत सखू मंदिर परिसरात विविध प्रकल्प, शिवाजी स्टेडियमवर चालण्यासाठी स्वतंत्र ट्रॅक अशा महत्त्वपूर्ण कामांचा यात समावेश आहे. 

एप्रिल 2018 ते मार्च 2019 पर्यंतचा अर्थसंकल्प दहा लाख रुपये शिलकीचा आहे. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी हा अर्थसंकल्प मांडला. यावेळी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, माजी सभापती विजय वाटेगावकर, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, नगरसेवक विनायक पावसकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.

आरोग्य, स्वच्छता, शुद्ध पाणी पुरवठा, रस्ते, गटर्स यासह  नागरी सुविधांवर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. हुतात्मा स्मारक, सुधारीत भुयारी गटर योजना, हद्दवाढीनंतर कराडमध्ये समाविष्ट झालेल्या भागातील रस्त्यांसाठी 1 कोटी, नव्याने टाकण्यात येणार्‍या चार वितरण नलिका, तिर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत संत सखु मंदिराच्या ठिकाणी विविध प्रकल्प उभारणे या कामांसाठी अर्थसंकल्पाद्वारे तरतूद करण्यात आली आहे.  

सौरभ पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना नगरपरिषदेकडून देण्यात येणार्‍या पैशाबाबत शासनाची चर्चा करून नगरपालिकेचे पैसे वाचवावे याबाबत सुचविले. यावर जयवंत पाटील यांनी हा वाद संपुष्टात आल्याचे सांगितले. तसेच नवीन बागा करण्याबरोबरच नाक्यांचे सुशोभिकरण करावे, असा विषय सौरभ पाटील यांनी मांडत त्याबाबत जागाही सुचवली. त्याचबरोबर महिला व बालकल्याण विभागासाठी आलेल्या निधीतून महाविद्यालयीन विद्यार्थीनींसाठी एमपीएसीसाठी उपयुक्‍त क्‍लास द्यावेत, असेही त्यांनी सुचवले. यावर महिला व बालकल्याण समिती सभापती आशा मुळे यांनी युवतींसाठी एमआयसीटी, टायपिंगसारखे प्रशिक्षण दिले जात असल्याचे सांगून एमपीएसीबाबत नियोजन करण्यात येईल, असे सांगितले.

आरोग्य समिती सभापती प्रियांका यादव, पाणीपुरवठा सभापती अरूणा पाटील, नियोजन समिती सभापती करिश्मा इंगवले, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, अंजली कुंभार, राजेंद्र माने, अतुल शिंदे, सुहास जगताप यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. 

‘त्यांचा’ साधा नामोल्लेखही नसल्याने नाराजी ...

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी मांडलेल्या बजेटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निधीचा उल्‍लेख केला आहे. मात्र, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. पी. डी. पाटील यांच्यासह माजी आमदार विलासराव उंडाळकर यांचा साधा नामोल्लेखही करण्यात आला नसल्याकडे विजय वाटेगावकर यांनी लक्ष वेधत तीव्र नाराजी व्यक्‍त केली. यावर विनायक पावसकर यांनी ना. शेखर चरेगावकर, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्याही नावाचा उल्‍लेख असणे आवश्यक आहे, असे सांगत वाटेगावकर यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.