Thu, Jun 27, 2019 11:53होमपेज › Satara › कराडजवळ महामार्गावर अपघात; कोल्हापूर जिल्ह्यातील दोघे ठार

कराडजवळ महामार्गावर अपघात; कोल्हापूर जिल्ह्यातील दोघे ठार

Published On: Jul 22 2018 11:06PM | Last Updated: Jul 22 2018 10:54PMकराड : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथील उड्डाणपुलावर दुचाकी व टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे ठार झाले.  शनिवार, दि. 21 रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ठार झालेले दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. अपघाताची माहिती मिळताच डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. 

वसंत रामू शिंदे (वय 55, रा. भैरेवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) व प्रविण काकासोा पाटील (वय 25, रा. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, वसंत शिंदे व प्रविण पाटील हे दोघेजण कोळेवाडी येथे नातेवाईकांकडे दुचाकीवरून निघाले होते. त्यांच्या दुचाकीने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर बाजूकडून पुणे बाजूकडे निघालेल्या टेम्पोला पाचवड फाटा येथील उड्डाण पूलावर 
पाठमागून धडक दिली. यामध्ये दुचाकी टेम्पोच्या पाठीमागे अडकून सुमारे 100 ते 120 मीटर फरफटत जाऊन दुभाजकाला धडकून थांबला. तर अपघातानंतर दुचाकीवरील वसंत शिंदे व प्रविण पाटील हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे या अपघातात दोघेही जागीची ठार झाले. यावेळी मोठा आवाज झाल्याने रस्त्याकडेल्या असलेल्या व्यावसायीकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता अपघात होऊन दोघेजण रस्त्यावर पडल्याचे त्यांना दिसले. त्यातील काही लोकांनी 100 नंबरवरून पोलिसांना संपर्क साधला. 

अपघाताची माहिती मिळताच डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्यासह तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर, शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे, वाहतुक शाखेचे संभाजी गायकवाड, शिवराम खाडे यांच्यासह अपघात विभागाचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातातील व्यक्‍तींजवळ असलेल्या मोबाईलवरून नातेवाईकांशी संपर्क साधल्यानंतर व खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. अपघाताची नोंद शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.