Fri, Apr 19, 2019 11:59होमपेज › Satara › एसटी चालकाला दगडाने मारहाण

एसटी चालकाला दगडाने मारहाण

Published On: Feb 13 2018 2:00AM | Last Updated: Feb 12 2018 11:10PMकराड  : प्रतिनिधी

ट्रॅक्टर चालकाने एसटी चालकाला दगडाने मारहाण केल्याची घटना कराड तालुक्यातील सुर्ली घाटात सोमवारी (दि. 12) सकाळी 11.30 च्या सुमारास घडली. याप्रकरणी एसटीचालक गंभीर जखमी असून ट्रॅक्टरचालकावर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दत्तात्रय श्रीरंग शिंदे (वय 31, रा. आंबेगाव, ता. कडेगाव)  असे जखमी एसटीचालकाचे नाव आहे.  याबाबत पोलिसांनी सांगितले की, विटा आगाराची विटा-कराड बस एसटीचालक दत्तात्रय श्रीरंग शिंदे व वाहक शिवाजी विष्णू बुधावले हे दोघे जण कराडकडे घेऊन येत होते. सोमवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास त्यांची बस सुर्ली घाटानजीक आली.

त्यावेळी घाटाच्या पहिल्याच वळणावर ट्रॅक्टर ट्रॉलीमधून खडी घेऊन कराडच्या दिशेने चालला होता. त्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून एसटी पुढे घेऊन जात असताना समोरून अचानकपणे जीप आल्याने शिंदे यांनी बस जागेवर उभी केली. दरम्यान, पाठीमागून येणार्‍या ट्रॅक्टरचालकाने ट्रॅक्टर बसच्या डाव्या बाजूने घासत पुढे आणला. त्यामुळे नक्‍की काय प्रकार झाला आहे, हे पाहण्यासाठी एसटीचालक शिंदे व वाहक बुधावले एसटीतून खाली उतरले.

यावेळी ट्रॅक्टरचालकाने रस्त्याकडेला पडलेला दगड उचलून शिंदे यांच्या तोंडावर मारला व तो निघून गेला. शिंदे यांच्या हनुवटीवर मार लागून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यानतर शिंदे यांनी याबाबतची तक्रार कराड तालुका पोलिसांत दिली आहे. यावरून अनोळखी ट्रॅक्टरचालकावर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रशांत तारळकर  करत आहेत.