Mon, Apr 22, 2019 04:27होमपेज › Satara › महिलांसाठी म्युझिकल हेल्थ कार्यक्रम

महिलांसाठी म्युझिकल हेल्थ कार्यक्रम

Published On: Feb 12 2018 2:08AM | Last Updated: Feb 11 2018 7:39PMकराड : प्रतिनिधी

कुटुंब आरोग्यदायी रहावे, म्हणून कष्ट करणार्‍या महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत असते. त्यामुळेच महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने  दै.‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबकडून दि कराड अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयातील शताब्दी सभागृहामध्ये बुधवार, 14 फेब्रुवारीला दुपारी 4 ते 7 या वेळेत ‘म्युझिकल हेल्थ’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे प्रायोजक असणार्‍या सह्याद्रि हॉस्पिटलच्या माध्यमातून  ‘स्त्री आरोग्य काळजी व प्रतिबंधात्मक उपाय’ अशा विषयावरचा कार्यक्रम मनोरंजक व्हावा म्हणून काही गाण्यांची जोड दिली आहे.  आरोग्य  विषयक आव्हानांना सामोरे जाताना डॉक्टरी उपायांसोबतच जगणे आनंदी असणेही तितकेच गरजेचे आहे आणि म्हणूनच काही निवडक गाणी या कार्यक्रमात सादर होणार आहेत.

कस्तुरी क्‍लबच्या माध्यमातून नेहमीच स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. स्त्री म्हणजे कुटुंबांच्या इमारतीचा मुख्य खांब असतो. असे असूनही स्वत:च्या आरोग्याकडे मात्र तिचे दुर्लक्ष  असते. खरे तर  घरातील स्त्री आरोग्याबाबत जागरुक असेल तर नक्‍कीच ते कुटुंब  निरोगी असते. ह्याच गोष्टीचे महत्त्व जाणून या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सह्याद्री हॉस्पिटलच्यावतीने होणार्‍या या कार्यक्रमात स्त्रीरोगतज्ञ डॉ. हेमंत तडसरकर आहार, स्थुलता, ताणतणाव यामुळे उद्भवणारे विकार तसेच मेनोपॉझ, हृदयरोग अशा स्त्री आरोग्यविषयीचे सर्वच गोष्टींची सविस्तर माहिती, काळजी व उपाय यासंदर्भात माहिती देणार आहेत.  यानंतर कर्करोग तज्ज्ञ डॉ. दिग्विजय पाटील हे ‘स्त्रियांतील स्तनाचा कर्करोग व गर्भाशयाचा कर्करोग’ याची कारणे, लक्षणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय याची  सविस्तर माहिती देणार आहेत.  आरोग्य तपासण्यांसाठी विशेष सवलती देण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम शहरातील सर्व महिलांसाठी खुला राहणार आहे.