Wed, Apr 24, 2019 01:52होमपेज › Satara › दक्षता घ्या; अन्यथा गॅसचा होऊ शकतो ब्लास्ट

दक्षता घ्या; अन्यथा गॅसचा होऊ शकतो ब्लास्ट

Published On: Mar 05 2018 1:45AM | Last Updated: Mar 05 2018 1:45AMकराड : चंद्रजित पाटील 

घरोघरी मातीच्या चुलींची जागा आता गॅस सिलिंडरने घेतली आहे. केवळ शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही गॅस सिलिंडरचा वापर वाढला आहे. अशावेळी सुरक्षाही महत्त्वाची असून अनेकदा सुरक्षेबाबत लोकांमध्ये निष्काळजीपणा दिसून येतो. मात्र, जागरूकता नसल्याने अनेकदा अपघातांना सामोरे जावे लागते. या अपघातांमध्ये केवळ वित्त हानीच होते असे नाही तर अनेकदा आपण आपल्या जवळच्या माणसांनाही गमावण्याचा धोका निर्माण होतो. गॅस सिलिंडरशी विशेषत: गृहिणींचा जास्त संबंध येतो. त्यामुळे सुरक्षिततेबाबत त्यांच्यामध्ये जागरूकता असणे आवश्यक आहे. 

गॅस सिलिंडर नेहमी खेळती हवा आणि विशेष म्हणजे उष्णता नसणार्‍या ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. सिलिंडरची टाकी आडवी ठेवण्याचा प्रयत्न करूच नये. गॅस सिलिंडरपेक्षा नेहमी उंचीवरच ठेवणे आवश्यक असून गॅसची शेगडी आयएसआय मार्क असलेली वापरणे सुरक्षिततेच्या द‍ृष्टीने योग्य आहे. अनेकदा बिघाड झाल्यावर आपण स्वत: तो बिघाड काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र असे करणे धोकादायक असून बिघाडाची माहिती संबंधित गॅस एजन्सीला देणेच योग्य आहे.

त्यामुळे संबंधित एजन्सीकडून तज्ञ व अनुभवी कर्मचारी आपल्याकडे पाठवला जातो. याशिवाय स्वयंपाक घरात कपडे वापरतानाही विशेष दक्षता घेणे आवश्यक असून सुती कपडे घालणे केव्हाही सुरक्षितततेच्या द‍ृष्टीने योग्य ठरते. त्याचबरोबर गॅसवरील भांडे उतरवताना आपल्याकडे महिला बहुतांश वेळा साडीचा पदर अथवा दुपट्टा वापरताना पहावयास मिळतात. मात्र ते धोकादायक ठरू शकते. गॅसची शेगडी आणि गॅस सिलिंडर या दोघांना जोडणारी रबरी नळी, बर्नर इत्यादी गोष्टी नियमितपणे तपासून पाहाव्यात. गॅसवर काय ठेवलंय ? त्याकडे कधीकधी आपले लक्ष नसते. त्यामुळे दूध, आमटी, चहा असे पदार्थ ऊतू जाऊन बर्नर खराब होतो. म्हणून बर्नर अधूनमधून साफ करून घ्यावा, अन्यथा गॅसला बाहेर पडायला पुरेसा वाव मिळणार नाही. त्यामुळे एखाद्या वेळी अपघाताला सामोरे जावे लागण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

सिलिंडर आणि शेगडी यांना जोडणारी रबरी नळी हाही अतिशय महत्त्वाचा घटक आहे. मात्र, अनेक घरात गॅस कनेक्शन घेतल्यापासून ही नळी बदलणे आवश्यक असल्याचे माहिती असूनही दुर्लक्ष केले जाते. अनेकदा नळीला लहान लहान छेद गेल्याचे पहावयास मिळते. यातून गॅस लिक होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे गॅस गळती होऊन भीषण दुर्घटना घडल्यावर आपले डोळे उघडण्यापेक्षा योग्य वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. वेळेत रबरी नळी बदलून घेतल्यास गॅस लिक होण्याचा धोका टाळला जाऊ शकतो. गॅस पुरवठा करणार्‍या कंपन्या सुरक्षा ब्रॅण्डच्या रबरी नळीची शिफारस करतात. या नळ्या दीर्घकाळ टिकतात व वापरायलाही सुरक्षित असतात.

सर्वसाधारणपणे इतर नळ्या दर दोन वर्षांनी, तर सुरक्षा नळ्या दर पाच वर्षानी बदलाव्यात. हल्ली बर्‍याच जणांकडे दोन सिलिंडर्स असतात. जो सिलिंडर वापरात नाही, मग तो भरलेला असो की रिकामा, त्याचे झाकण घट्ट लावावे. नवीन सिलिंडर आल्यावर त्याचे वजन व सील तपासून पाहावे.

गॅस गळती झाली तर ....

एवढी सगळी काळजी घेऊनही जर कधी गॅसगळती झाली, तर सर्वप्रथम शेगडी आणि सिलिंडरची चावी नीट बंद करावी. हवा खेळती राहण्यासाठी घराचे दरवाजे आणि खिडक्या पूर्णपणे उघडून ठेवाव्यात. कोणत्याही परिस्थितीत काडीपेटी अथवा लाईटरचा उपयोग करू नये. तसेच विजेची बटनेही चालू करू नयेत. आणीबाणीच्या प्रसंगी कोणत्या क्रमांकावर संपर्क साधायचा, ती सर्व माहिती आपल्या गॅसच्या पावतीवर, तसेच गॅस वितरकाच्या कचेरीत मिळू शकते.

यापुढे तुम्ही जे वाचाल ते खूप महत्त्वाचे आहे आणि गॅस सिलिंडरधारकांना त्याबद्दल फारशी माहिती नसते! सगळी काळजी घेऊनही काही अपघात होऊन नुकसान झाले, घरातील एखाद्या माणसाला इजा झाली, किंवा कोणाचा मृत्यू झाला, तर त्यासाठी विम्याचे संरक्षण आहे. गॅस पुरवठा करणार्‍या सार्वजनिक क्षेत्रातील सर्व कंपन्यांनी नोंदणीकृत गॅस धारकांना विम्याचे संरक्षण दिले आहे. याव्यतिरिक्त गॅस वितरकांनाही जोखीम विमा संरक्षण आहे. त्यामुळे अशा प्रकारे काही नुकसान झाल्यास गॅसधारकाने लगेच आपल्या पुरवठादाराकडे या घटनेची लेखी तक्रार करणे आवश्यक आहे. हा पुरवठादार याबाबत संबंधित कंपनी आणि विमा कंपनी यांच्याशी संपर्क साधेल. एवढेच नव्हे, तर सदर पुरवठादाराने गॅसधारकाला विम्याचा दावा सादर करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करणे अपेक्षित आहे.

गॅसची जोडणी देताना गॅसपुरवठादार एक पावतीवजा पत्र देतात. त्याच्यामागे गॅसधारकाने घ्यायच्या काळजीसंबंधी अटी छापलेल्या असतात. जो गॅसधारक या सर्व अटींचे व्यवस्थित पालन करील, त्यालाच या विम्याचे संरक्षण मिळेल. अनधिकृतरित्या गॅस जोडणी घेणारे, जास्ती पैसे देऊन सिलिंडर मागवणारे लोक या विमा संरक्षणासाठी पात्र ठरत नाहीत. 

 घरातील उदबत्ती, देवासमोरील दिवे, मेणबत्ती आणि इतर सर्व गोष्टी बंद करा

 एलपीजी शेगडी बंद करा आणि रेग्युलेटरचे बटनही बंद करा

  रेग्युलेटर पकडा आणि त्याखालील काळी रिंग दाबून रेग्युलेटर वर उचला. रेग्युलेटर सिलिंडरपासून वेगळे होईल.

सुरक्षेसाठी सिलिंडरला लावलेली प्लास्टिकची पांढरी कॅप सिलिंडरच्या तोंडावर लावून बंद करा. कॅप व्यवस्थित लागल्यावर छोटा आवाज येईल. आता सिलिंडर बाजूला ठेवून द्या.

नव्या सिलिंडरची कॅप खाली दाबून दोरी खेचा, जेणेकरून सिलिंडर उघडेल.

 बटन बंद असलेल्या रेग्युलेटरची काळी रिंग वर खेचा आणि सिलिंडरच्या तोंडावर उभ्याने दाबा. सिलिंडरच्या व्हॉल्वच्या षटकोनी आकाराला रेग्युलेटरचा स्पर्श होईल तोपर्यंत दाबा.

आता रेग्युलेटरची काळी रिंग सोडून द्या. हलकासा आवाज येईल. आता रेग्युलेटर सिलिंडरला योग्यरितीने बसले आहे. आता रेग्युलेटर सुरू करून शेगडीवर गॅस पेटवा.

एलपीजी सिलिंडरची एक्सपायरी डेट कशी ओळखावी?

सिलिंडरच्या एक्सपायरी डेटची माहिती सिलेंडरवरील मेटल पट्टीवर असते. जी रिंग गॅसच्या तोंडावर असते. त्याच्या आतील बाजूमध्ये तारखेबाबत माहिती लिहीलेली असते. त्यामुळे एक्सपायरी डेट ओळखणे अधिक सोपे असते. इंग्रजी आद्याक्षरे हे महिन्याची माहिती देतात, तर नंबर आपल्याला कोणत्या वर्षात संपत आहेत ? त्याची माहिती देतात. यामध्ये वर्ष हे चार इंग्रजी आद्याक्षरात विभागलेले आहेत. दाहरणार्थ  जर तुमच्या सिलिंडरवर अ18 असे लिहिले असेल. तर त्याचा अर्थ असा आहे की  म्हणजे तो सिलिंडर मार्चपर्यंत वापरू शकता आणि 18 म्हणजे 2018. त्यामुळेच नागरिकांनीही याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.