Sun, Jul 21, 2019 06:29होमपेज › Satara › तर मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन

तर मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन

Published On: Feb 13 2018 2:00AM | Last Updated: Feb 12 2018 11:23PMकराड  : प्रतिनिधी 

सातारा जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी कारखाने सुरू झाल्यानंतही नियमाप्रमाणे ऊस गाळप केल्यानंतर 15 दिवसांमध्ये शेतकर्‍यांना पहिले बिल दिलेले नाही. त्याचबरोबर साखरेचे दर पडल्याचे कारण सांगून दर कमी करण्याचा प्रयत्न कारखानदारांकडून होत आहे. त्यामुळे अशा कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करावेत, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.  त्याचबरोबर कारखानदारांनी व्याजासह ऊस बिल द्यावे, अशी  मागणी करत प्रसंगी मुंबईत मंत्रालया समोर तीव्र आंदोलन करू, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.

बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, सागर कांबळे, विक्रम थोरात, उत्तमराव खबाले यांच्यासह ‘बळीराजा’च्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी सकाळी कराड विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी ना. पकंजा मुंडे, ना. सदाभाऊ खोत यांच्यासह पृथ्वीराज देशमुख, डॉ. अतुल भोसले हेही उपस्थित होते. प्रारंभी मुल्ला यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत कारखानदारांकडून शेतकर्‍यांवर होणार्‍या अन्यायाचा पाढा वाचला.

जिल्ह्यातील काही कारखाने तीन महिन्यांपूर्वी सुरू झाले आहेत.नियमाने ऊस गाळप केल्यानंतर पहिले बिल 15 दिवसांमध्ये देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र, काही कारखान्यांनी अजूनही उसाचा दर जाहीर केलेला नाही. याशिवाय साखरेचे दर कमी असल्याचे सांगत उसाचा दर कमी करण्याचा कारखानदारांचा प्रयत्न सुरू आहे. बळीराजा शेतकरी संघटना हे खपवून घेणार नाही, असे निवेदनात नमूद करत ज्या कारखान्यांनी दर जाहीर केलेला नाही, त्यांचे गाळप परवाने रद्द करावेत, तसेच ज्या कारखान्यांनी 15 दिवसांमध्ये उसाचा पहिला हप्‍ता दिलेला नाही, तो व्याजासह द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.