Mon, Sep 24, 2018 17:05होमपेज › Satara › रस्ता रूंदीकरणाबाबत सकारात्मक विचार करू

रस्ता रूंदीकरणाबाबत सकारात्मक विचार करू

Published On: Feb 13 2018 2:00AM | Last Updated: Feb 12 2018 11:27PMकराड ; प्रतिनिधी 

येथील दत्त चौक ते मार्केट यार्ड दरम्यानचा रस्ता 18 मीटर इतकाच असावा. 30 मीटर रस्ता झाल्यास नागरिकांना मोठ्या प्रमाणावर झळ बसेल, असे गार्‍हाणे डॉ. अतुल भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासह माजी नगरसेवक महादेव पवार यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. दरम्यान, याप्रश्‍नी आपण सकारात्मक विचार करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. सोमवारी दुपारी इस्लामपूर येथील कार्यक्रम अटोपून कराड  विमानतळावरून मुंबईकडे रवाना झाले. यावेळी ना. चंद्रकांत पाटील, ना. पंकजाताई मुंडे, ना. महादेव जानकर उपस्थित होते. 

कराडमधील दत्त चौक ते मार्केट यार्ड रस्ता 30 मीटर करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यापूर्वीही नगरपालिकेने याला विरोध करत प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, हा प्रस्ताव फेटाळण्यात आला असून आता नव्याने पालिका सभागृहात रस्ता 18 मीटर करावा, असा ठराव करण्यात आला आहे. 30 मीटर रस्ता झाल्यास दत्त चौकापासून मार्केट यार्डपर्यंत 230 कुटुंबांना झळ बसणार असून इतक्या मोठ्या रस्त्याची कराडमध्ये गरज नाही, असे म्हणणे डॉ. अतुल भोसले यांच्यासह महादेव पवार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. मुख्यमंत्र्यांनी याप्रश्‍नी  सकारात्मक विचार करू, अशी ग्वाही डॉ. अतुल  भोसले व नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांना दिली. त्यामुळे या प्रश्‍नावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.