Fri, Jul 19, 2019 17:51होमपेज › Satara › महामार्गावर मरण झाले स्वस्त

महामार्गावर मरण झाले स्वस्त

Published On: Feb 10 2018 1:39AM | Last Updated: Feb 09 2018 8:25PMकराड : प्रतिनिधी

मलकापूर शहराला विभागून जाणार्‍या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच अपघाताची मालिका सुरू असते. बरेच अपघात नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळेच घडल्याचे वास्तव आहे. महामार्गावरून भरधाव वेगात वाहने जात असतानाही जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडला जात असल्याने महामार्गावर मरण स्वस्त झाले असल्याचे दिसून येते. 
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच अपघाताच्या घटना घडत असतात. बरेच अपघात भरधाव वेगात असणार्‍या वहानांमुळे तर काही अपघात महामार्ग ओलांडताना नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे घडल्याचे वास्तव आहे. 

अपघात होऊ नयेत म्हणून महामार्गाच्या दुतर्फा शहर व गावालगत संरक्षक ग्रील लावली आहेत. मात्र तरीही प्रवाशी या संरक्षक ग्रीलवरून माकड उड्या मारताना दिसतात. अशा बेजबाबदार पणामुळे व ग्रीलवरून उड्या मारताना अनेक प्रवाशांचा तोल जाऊन ते थेट वहानांच्या चाकाखाली चिरडल्याच्या घटना ताज्या असताना यातून कुणीही शहाणपण घेताना दिसत नाही. उलट मरणाला निमत्रंण देण्याचाच प्रकार पहायला मिळतो.

मलकापूर विकसीत शहर असल्याने व परिसरात छोटे मोठे उद्योगधंदे असल्याने येथे नेहमीच वर्दळ पहायला मिळते. विविध शाळा, महाविद्यालये, भाजी मंडई यामुळे परिसरात नागरिकांचा राबता असतो.राष्ट्रीय महामार्गामुळे शहर पूर्व व पश्‍चिम विभागल्याने विद्यार्थी व नागरिकांना महामार्ग ओलांडल्या शिवाय पर्याय नाही. मात्र यासाठी भुयारी मार्ग व उड्डाण पुलाची सोय असताना देखील काही नागरिक महामार्गावरूनच जाण्याचे धाडस करतात. जीव धोक्यात घालून रस्ता पार करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देणे हे माहित असताना देखील काही लोक हे धाडस करतात.

मलकापूरचे मुख्य प्रवेशद्वार, भाजी मंडई, कोयना वसाहत, एन.पी.मोटर्स, मळाईदेवी पतसंस्था, कृष्णा हॉस्पिटल, खरेदी-विक्री पेट्रोल पंप, वारणा हॉटेल, नवरंग हॉटेल अशा वर्दळीच्या ठिकाणी नागरिक महामार्ग ओलांडत असतात. वास्तवीक खरेदी विक्री पेट्रोल पंपाजवळ पादचारी पुल असताना याचा वापर फारसा केला जात नाही.  एखाद्या चुकीमुळे अपघात  होऊन स्वत:चा जीव जातोच  मात्र चुक नसताना  वहानधारकाला जेलची हवा खावी लागते, याचाही विचार संबंधितांनी करण्याची गरज आहे.