Mon, Apr 22, 2019 06:21होमपेज › Satara › बोगस मतदारांचा गोलमाल

बोगस मतदारांचा गोलमाल

Published On: Dec 20 2017 1:45AM | Last Updated: Dec 19 2017 10:53PM

बुकमार्क करा

कराड ः प्रतिनिधी

मलकापूर नगरपंचायत निवडणूकीचे वारे वाहू लागले असून मतदार नोंदणीमध्ये अनेक ठिकाणी बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. शहरात वास्तव्यास नसलेल्या लोकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली असून याबाबत प्रांताधिकार्‍यांसह तहसिलदारांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. मलकापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू  लागले आहे. त्यासाठी राजकीय व्यक्तींनी जुळवाजुळव करण्यास सुरूवात केली आहे. निवडणुक जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची राज्यकर्त्यांची तयारी असते. त्याचाच एक भाग म्हणून सध्या बोगस मतदार नोंदणी केली जात असल्याचा आरोप होत आहे. 

निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी मलकापूर शहरातील मतदार याद्या जाहीर केल्या. मात्र, त्यामध्ये अनेक नावे बोगस असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शहरात वास्तव्यास नसलेल्या लोकांची नावे मतदार यादीत असल्याचा आरोप करत त्याबाबतच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यातच मतदार यादीमधील नावे कमी करणे व नवीन नावांचा यादीत समावेश करण्यासाठी आडीच महिन्यांची मदत देण्यात आली. दरम्यानच्या कालावधीतही अनेकांनी बोगस मतदार नोंदणी केल्याचा आरोप विद्यमान नगरसेवक हणमंतराव जाधव, सूर्यकांत खिलारे, सागर निकम यांनी केला आहे. त्याबाबतही तक्रार त्यांनी प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांच्यासह तहसिलदार राजेंद्र शेळके यांच्याकडे केली आहे. 

रेशनकार्डवर नाव नसतानाही मतदार यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे. बी.एल.ओ.चा तसेच शाळेचा बोगस दाखल जोडून मतदार यादीमध्ये नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. राजकीय फायद्यासाठी बी.एल.ओ.ना हाताशी धरून काही लोकांनी मतदार यादीत बोगस नावांचा समावेश केल्याचा आरोपही त्यांनी केला. ऐवढेच काय कराडलगतचया व पाटण तालुक्यातील काही गावांमधील मतदार यादीत नावे असतानाही त्यांची नावे मलकापूरमधील विशेषत: आगाशिवनगरमधील मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच बाहेरच्या तालुक्यातील बी.एल.ओ.ना हाताशी धरून तेथील मतदार यादीमध्ये नाव नसल्याचा दाखल घेऊन संबंधिताचे नाव येथील मतदार यादीत समाविष्ठ केल्याचेही प्रकार घडले आहेत. मलकापूरमध्ये नाव नाही किंवा कोणताही पुरावा नसताना अनेक बोगस नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.