Wed, May 22, 2019 17:05होमपेज › Satara › वाखाण परिसर  बनतोय असुरक्षित

वाखाण परिसर  बनतोय असुरक्षित

Published On: Feb 12 2018 2:08AM | Last Updated: Feb 11 2018 7:35PMकराड  :  प्रतिनिधी 

सात वर्षापूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीपूर्वी कराड शहराची हद्दवाढ होऊन वाखाण परिसराचा शहरात समावेश झाला. तेव्हापासून या भागात नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढला आहे. मात्र वाढत्या नागरीकरणाबरोबरच चोर्‍या, छेडछाड यासारख्या प्रकारांमुळे दिवसेंदिवस या परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे. त्यामुळेच या परिसरात पोलिस प्रशासनाकडून याठिकाणी कायमस्वरूपी पोलिस चौकी उभारणे आवश्यक बनले आहे. कराडपासून हाकेच्या अंतरावर पण कराडमध्ये समाविष्ट नसणारा परिसर म्हणून वाखाणची ओळख होती. मात्र ही ओळख 2011 मध्ये पुसली जाऊन तो संपूर्ण भाग कराडमध्ये समाविष्ट झाला.

कराडमधील सोमवार पेठ आणि वाखाण परिसर ही दोन ठिकाणी वास्तव्यासाठी अतिशय योग्य मानली जातात. सोमवार पेठेतही पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने काही वर्षापासून वाखाण परिसरात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. नागरीकरणाबरोबर या भागात छोट्या मोठ्या चोर्‍यांचे प्रमाणही वाढले आहे. एका झेरॉक्स मालकाच्या घरी झालेली घरफोडीसह परिसरातील चार ते पाच ठिकाणी एकाच रात्री झालेल्या चोर्‍या, एका शिक्षिकेचे शिवाजी स्टेडियमकडील मार्गाने चालत येत असताना उपनगराध्यक्षांच्या घराच्या परिसरात धूम स्टाईलने पळवलेले दागिने, चार महिन्यांपूर्वी एका शालेय मुलीची झालेली छेडछाड हे प्रकार ताजे आहेत.

याशिवाय यापूर्वीही अनेकदा छोट्या - मोठ्या चोर्‍या या परिसरात झाल्या आहेत. याशिवाय याच परिसरातील एका चोरट्यांच्या टोळीलाही पोलिसांनी सुमारे दोन वर्षापूर्वी गजाआड केले होते. हे सर्व प्रकार पाहता या परिसरातील नागरिकांमध्ये दिवसेंदिवस असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे.