होमपेज › Satara › कराड अर्बनला प्रथम क्रमांकावर नेणार

कराड अर्बनला प्रथम क्रमांकावर नेणार

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 10:47PMकराड : प्रतिनिधी

स्व. डॉ. द. शि. एरम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी कराड अर्बन बँक लोकाभिमुख केली. आज बँक मोठी झाली आहे. मात्र, तरीही आम्ही समाधानी नाही, असे सांगत कराड अर्बन बँक राज्यातील एक नंबरची बँक असली पाहिजे. हेच आपले स्वप्न आहे आणि तोच आपला ध्यास असल्याचे अर्बन कुटुुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांनी सांगितले.

कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सांगता सोहळ्यात कार्ला येथील अमृत संतुलन व्हिलेजचे संस्थापक डॉ. बालाजी तांबे यांच्या हस्ते सुभाषराव जोशी यांचा अमृतमहोत्सवी सत्कार करण्यात आला. या सत्कारास उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी डॉ. तांबे यांच्यासह वीणाताई तांबे, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव, बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, सुनीता जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुभाषराव जोशी म्हणाले, 100 वर्षांत बँक खूप बदलली आणि स्थिरावलीही. बँकेने गेल्या 35 वर्षांत सहकार जपला. सहकार हाच बँकेचा आत्मा असल्याचे आपण मानतो. पारदर्शक कारभार, दर्जेदार ग्राहक सेवा यामुळे 80 च्या दशकातील संघर्षमय स्थितीवर मात करत आम्ही नवीन मापदंड प्रस्थापित केले आहेत. आपल्या जडण-घडणीत बँकेचा खूप मोठा वाटा आहे. स्व. द. शि. एरम यांच्यासारख्या गुरु लाभला, हे आपले भाग्य असल्याचे सुभाषराव जोशी यांनी यावेळी सांगितले.

डॉ. सुभाषराव एरम म्हणाले, बँकेने स्व. डॉ. एरम व सुभाषराव जोशी यांच्या नेतृत्चाखाली बँकेची प्रगती झाली. स्व. बाबांच्या पश्‍चात सुभाषराव जोशी यांनी आपल्यावर जबाबदारी सोपवत अर्बन कुटुंब एकसंघ ठेवले. संपूर्ण जिल्हा दिव्यांगमुक्त व्हावा, हा त्यांचा ध्यास आहे. बँक आपल्या सर्वांची माऊली, मातृसंस्था आहे. त्यामुळे आपण ती जपलीच पाहिजे. स्व. बाबा आपल्यासाठी अवतारी पुरुषच होते. सुभाषराव जोशींच्या रुपाने आजही गुरु - शिष्याचे नाते सुरु असल्याचे डॉ. एरम यांनी यावेळी नम्रपणे सांगितले.

प्रारंभी डॉ. बालाजी तांबे यांच्या हस्ते बँकेच्या मुख्य कार्यालयात स्व. डॉ. द. शि. एरम व सुभाषराव जोशी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच यावेळी सुभाषराव जोशी यांच्या जीवन चरित्रावरील ‘आठवांचा अजिंठा’ व कराड अर्बन बँकेच्या वाटचालीचा ‘मी कराड अर्बन बँक बोलतेय’ या पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे प्रकाशन करण्यात आले. अ‍ॅड. संभाजी मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अनिल बोधे यांनी प्रास्तविक तर सीए दिलीप गुरव यांनी आभार मानले.