Sat, Jul 20, 2019 02:49होमपेज › Satara › सद‍्गुणांचे कौतुक, ही कराडची परंपरा

सद‍्गुणांचे कौतुक, ही कराडची परंपरा

Published On: Apr 19 2018 1:37AM | Last Updated: Apr 18 2018 8:53PMकराड : प्रतिनिधी

सद‍्गुणांचे कौतुक करणे, ही आपली कराडची परंपरा आहे.शिक्षकांकडे शिकवण्याचा सद‍्गुण असतो. आतून आधार व वरून थोपटण्याच्या त्यांच्या गुणांमुळे अनेक माजी विद्यार्थी आज त्यांचे नाव घेत आहेत. विद्याधर गोखले यांनी कराडचा ग्रंथराज लिहला. नव्या पिढीला शहराच्या इतिहासाविषयी काही माहिती नाही. त्यामुळे हा इतिहास त्यांना शाळांमधून सांगितला पाहिजे, प्रतिपादन सिक्‍कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले. 

येथील कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. विद्याधर गोखले यांच्या नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आ. बाळासाहेब पाटील, आ. आनंदराव पाटील, अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, बाळासाहेब कुलकर्णी, डॉ.अशोक गुजर, अशोकराव शेटे यांची उपस्थिती होती.

राज्यपाल पाटील म्हणाले, कराड अर्बन बँकेच्या अडचणीच्या काळात प्रा. विद्याधर गोखले यांनी बँकेला आधार दिला. याच बँकेने मोठी प्रगती केली. आज सरांचे वय 80 असून शतायुषी झालेली बँक त्यांना आशीर्वाद देत आहे. प्रा. विद्याधर गोखले सरांचा नागरी सत्कार आयोजित करून सहस्रचंद्र दर्शन सोहळा समितीने ही परंपरा जपली असल्याचे ना. चरेगावकर म्हणाले, गोखले सर आणि कराड अर्बन बँक हे एक समीकरण झाले आहे. त्यांच्यात साहित्यिक गुण असल्याने त्यांनी पुढील काळात सहकाराविषयी काही लिहल्यास त्यांचा अनुभव सहकारातील कार्यकर्त्यांना उपयुक्‍त ठरेल.

आ.बाळासाहेब पाटील म्हणाले, शहरासाठी योगदान देणार्‍या व्यक्‍तिमत्वांचा सत्कार करणे ही गावाची जबाबदारी आहे. शहराची ही संस्कृती असून स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने पुढे जात असताना जुन्या काळातील व्यक्‍तिमत्वांचा सन्मान होणे आवश्यक आहे. सुभाषराव जोशी म्हणाले, बँकेच्या अडचणीच्या काळात डॉ. द.शि.एरम यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बँकेच्या उर्जितवस्थेत योगदान देणार्‍या मंडळींमध्ये प्रा. गोखले हे अग्रस्थानी होते, असे सांगितले. 

आ. आनंदराव पाटील यांचेही यावेळी भाषण झाले. सारंग पाटील प्रकाश पाटील, आनंदराव पालकर, चंद्रशेखर देशपांडे, समीर जोशी, मोहनराव डकरे, सौ. रश्मी एरम, अ‍ॅड. संभाजीराव मोहिते यांच्यासह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. प्रा. अशोक चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांनी आभार मानले.

कराडचा सुधारित ग्रंथ लिहण्याची इच्छा ...

प्रा. गोखले म्हणाले, अर्बन बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी झालेले प्रयत्न, कोयनेतील भूकंपग्रस्त मुलांच्या शिक्षणाची सोय आणि कराडचा ग्रंथ ही महत्त्वाची कामे आपल्या हातून झाली. कराडचा ग्रंथ आणखी सुधारित लिहिण्याची आपली इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.