Sun, Apr 21, 2019 03:51होमपेज › Satara › नवीन पिढीत शास्त्रीय संगीत रूजावे

नवीन पिढीत शास्त्रीय संगीत रूजावे

Published On: Jan 17 2018 2:04AM | Last Updated: Jan 17 2018 1:15AM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी 

डॉ. शितल मोरे ; दै.  ‘पुढारी’ कट्ट्यावर उलघडले शास्त्रीय संगीताचे माधुर्य  शास्त्रीय संगीत हा संगीताचा मुळ पाया आहे. त्याशिवाय संगीत पूर्ण होवू  शकत नाही. घराघरामध्ये शास्त्रीय संगीत पोहोचणे गरजेचे आहे तरच या संगीतातील दर्दी तयार होतील. नवीन पिढीला या संगीताची आवड निर्माण होण्यासाठी पालक, शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत पुणे येथील एसएनडीटी वुमन्स युनिव्हर्सिटीच्या संगीत विभागप्रमुख व हिंदूस्थानी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासक डॉ. शितल मोरे यांनी व्यक्त केले. 

दै.पुढारी कराड कार्यालयास डॉ. शितल मोरे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ‘पुढारी कट्ट्या’वर झालेल्या  मुलाखतीमध्ये त्यांनी अभिजात शास्त्रीय संगीताची माहिती दिली. यावेळी कार्यालय प्रमुख सतीश मोरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अलापिनी जोशी, सागर जोशी, सतीश पेंढरकर तसेच डॉ. मोरे यांच्या शिष्या उपस्थित होत्या.

डॉ. मोरे म्हणाल्या, कानाला मधूर वाटणारे व हृदयाला भिडणारे स्वर म्हणजे शास्त्रीय संगीत होय. या संगीतातून मनाला शितलता मिळते. मन:शांतीतून मानवाचा विकास होतो. आणि त्यातूनच सामाजिक बांधिलकी निर्माण होते. त्यामुळेच शास्त्रीय संगीत हे सामाजिकता जोपासणारे संगीत आहे.  अभिजात संगीत म्हणजे स्वरांभोवती निर्माण झालेले भाव. सुगम व शास्त्रीय संगीत सात स्वरांवर आधारलेले असते. सुगम संगीतामध्ये शब्द स्वरबध्द केलेले असतात तर शास्त्रीय संगीतामध्ये स्वरांना महत्त्व जास्त आहे.

 त्यामुळेच जुन्या चित्रपटातील गाणी आजही गुणगुणली जातात किंवा ती गाणी ऐकायला मधूर वाटतात. त्या गाण्यातील त्यातील शब्द,  भावभावना व्यक्त करणार्‍या असतात. शास्त्रीय संगीत हे पूर्वी केवळ दरबारामध्येच असायचे आणि दरबारामध्ये काही ठरावीक लोकांनाच प्रवेश असायचा. त्यामुळे काही ठराविक लोकांसाठीच शास्त्रीय संगीत अशी प्रथा त्यावेळी पडली गेली, मात्र पं. भातखंडे यांनी शास्त्रीय संगीतावर अनेक पुस्तके विस्तृतपणे  लिहिली. त्याचा प्रसार केला.

शास्त्रीय संगीत काय आहे याची जाणीव हे संगीत शिकवणार्‍या  शिक्षकांनीच सुलभ व सोप्या भाषेत शिकवले पाहिजे. त्यामुळे हे संगीत समाजातील सर्व वर्गामध्ये प्रसारित होईल, असे सांगून डॉ. मोरे म्हणाल्या, संगीत शिकण्यासाठी कोणत्या ठराविक वयाची गरज नाही. कोणत्याही वयात संगीत शिकता येते.  सतीश मोरे यांनी ‘पुढारी कट्ट्या’चा हेतू सांगताना परिश्रमाने यशाची शिखरे सर केलेल्या व्यक्तींच्या अनुभवातून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित केले जाते असे सांगितले.  दरम्यान डॉ. शितल मोरे यांनी यावेळी राग सुधा सारंग धृत बंदिश तालावर आपल्या सुरेल आवाज गायला. यावेळी उपस्थित सर्व मंत्रमुग्ध झाले.