Wed, Apr 24, 2019 12:30होमपेज › Satara › उन्हाळा सुखकारक करण्यासाठी

उन्हाळा सुखकारक करण्यासाठी

Published On: Mar 05 2018 1:45AM | Last Updated: Mar 04 2018 8:41PMकराड : प्रतिनिधी 

लोकसंख्यावाढीमुळे होणारी उपलब्ध पाण्याची विभागणी, प्रचंड प्रमाणात वृक्षतोड, पर्यायी झाडे न लावणे, सिमेंटची बांधकामे, रस्ते, पदपथ आदी बांधकामांमुळे जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत न मुरणे, पाण्याचा भूगर्भातून प्रचंड उपसा, औद्योगिकीकरण आदी कारणांमुळे तापमानामध्ये वाढ होत आहे. सध्या तर उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे यादिवसात तापमानाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात  वाढत आहे. उन्हाळ्याच्या झळा  सहन कराव्या लागणारच आहेत मात्र तरीही शरीरात थंडावा निर्माण करणार्‍या पदार्थांचे सेवन केल्यामुळे उन्हाळाही सुखकारक होईल. उन्हाळा हा भारतातील तीन मुख्य ऋतूंपैकी एक आहे. उन्हाळ्यात हवामान गरम आणि कोरडे असते.   याच वेळी कलिंगड, फणस इत्यादी फळे पिकलेली दिसतात.

उन्हाळ्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणात आंबा पिकलेला दिसतो. निसर्गाने प्रत्येक ऋतू भिन्न रितीने बनविला आहे. पण त्यासोबतच प्रत्येक ऋतूचे फायदेही देऊ केले आहेत. थंडीत शरीरात उष्णता उत्पन्न करणार्‍या पालेभाज्या, फळे तर उन्हाळ्यात पचनासाठी हलके-फुलके खाद्यपदार्थ, फळे आणि पेय पदार्थ निसर्गापासून आपल्याला मिळतात. त्यात टरबूज, काकडी, खरबूज, द्राक्षे, लिंबू, स्ट्रॉबेरी, सफरचंद, आंबे ही फळे आहेत. 

या सर्वांमुळे फक्‍त शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते असे नाही तर शरीराला थंड बनवून पोषणही देतात. त्यातून मिळणारे व्हिटॅमिन्स् आणि खनिजे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवितात आणि त्वचेलाही सुंदर बनवितात. यांचा वापर कच्चे सलाड किंवा ज्यूसच्या रूपात किंवा काही शिजवून (काकडी, कोबी) खाऊ शकतो.  त्याव्यतिरिक्त उन्हाळ्यात रॉक सॉल्ट (खनिज मीठ), जिरे, शोप, वेलची हे मसाले तसेच दही, कैरीचे पन्हे, पुदिना, बेलाच्या फळाचा रस, सरबते, चटणी, जलजीरा या वस्तूही शरीरासाठी अनुकूल असतात. 

उष्म्यापासून संरक्षण होण्यासाठी हे करा...   

  •  सकाळी-सकाळी किंवा संध्याकाळी व्यायामासाठी नक्की वेळ काढा. 
  •  घरातून बाहेर निघताना सनक्रीन लोशन लावा. स्कार्फ, समर कोट घालूनच बाहेर जा. पाणी जास्त प्रमाणात प्या. 
  •  डोळ्यांना सूर्याच्या तेज किरणांपासून बचावासाठी चांगल्या क्वालिटीचे सन ग्लासेस वापरा. 
  •  बाहेर पडताना पाण्याची बॉटल शक्यतोवर सोबत असू द्या. त्यात ग्लूकोज किंवा लिंबू पाणी मिळवा. 
  •  कॉटनच्या हलक्या रंगाच्या कपड्यांना प्राधान्य द्या. 


तप्त दुपार आणि गरम हवा शरीरावरही परिणाम करतेच. त्यामुळे उन्हाळ्यात तुमच्या जेवणाच्या दिनचर्येतही बदल गरजेचा आहे. उन्हाळ्यात अधिक तेलकट खाणे नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे संतुलित आहाराची आवश्यकता असते. दिवसाची सुरुवात एक लीटर पाणी किंवा लिंबू पाण्याने करा. दिवसभर जास्तीत जास्त पाणी पिणेही आवश्यक असते. 

- डॉ. प्रकाश शिंदे अधिक्षक, उपजिल्हा रूग्णालय