Thu, Jul 18, 2019 14:52होमपेज › Satara › वारकर्‍यांच्या सेवेसाठी कराडमधून जाणार १ हजार स्वयंसेवक

वारकर्‍यांच्या सेवेसाठी कराडमधून जाणार १ हजार स्वयंसेवक

Published On: Jul 19 2018 4:50PM | Last Updated: Jul 19 2018 4:50PMकराड : प्रतिनिधी 

यंदाची आषाढी वारी वारकर्‍यांना सुखकर व्हावी यासाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ना. डॉ.अतुल भोसले यांनी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. याअंतर्गत आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात दाखल होणार्‍या 10 ते 12 लाख भाविकांना मंदिर समितीच्यावतीने 10 लाख लिटर मिनरल वॉटर उपलब्ध केले जाणार आहे. तसेच वारकर्‍यांना फराळाचेही वाटप केले जाणार आहे. या सर्व कार्यासाठी आणि वारकर्‍यांच्या सेवेसाठी कराडमधून डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानचे 1000 हून अधिक स्वयंसेवक पंढरपूरला जाणार आहेत. कराडमधून जाणारे हे स्वयंसेवक 21 ते 23 जुलै असे तीन  दिवस पंढरपूर मुक्कामी राहणार असून, वारकरी भाविकांना सेवा प्रदान करणार आहेत.

पंढरपूर येथे आषाढीनिमित्त करण्यात येणार्‍या या नियोजनासाठी स्वयंसेवकांची व्यापक बैठक कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या सभागृहात नुकतीच घेण्यात आली. यावेळी नामदार डॉ. अतुल भोसले यांनी मंदिर समितीच्यावतीने राबविल्या जाणार्‍या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, यात्रा कलावधीत सर्व भाविकांना श्री विठ्ठलाचे दर्शन घडावे यासाठी पंढरपूरात 15 ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. या स्क्रिनवरून थेट दर्शन दिले जाणार आहेत. याठिकाणी पाणीवाटप आणि फराळ वाटप केंद्र सुरू केले जाणार आहे. यात्रेत मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्यामुळे दुर्घटना घडल्यास भाविकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मंदिर समितीने भाविकांचा विमा उतरविला असून, या भविकांना 50 हजार ते 2 लाख रूपयांपर्यंतची मदत मिळणार आहे. विठ्ठल दर्शनाच्या ओढीने शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूरात दाखल झालेल्या भाविकांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी सर्व स्वयंसेवकांनी सज्ज रहावे, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.

या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, शिवाजीराव थोरात, मलकापूरचे नगरसेवक हणमंतराव जाधव, संजय शेटे, संजय शेवाळे, अतुल भोसले युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.