Wed, May 27, 2020 09:23होमपेज › Satara › कराड नगरपालिका चालणार सौर ऊर्जेवर

कराड नगरपालिका चालणार सौर ऊर्जेवर

Published On: Jul 27 2019 1:32AM | Last Updated: Jul 26 2019 8:16PM
कराड : प्रतिनिधी 

शहरातील सर्व पथदिवे बदलून एलईडी बसवून नगरपालिकेने वर्षाला सुमारे पाऊण कोटींची बचत सुरु केली आहे. आता अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देत पालिका प्रशासकीय इमारतीवर सौर ऊर्जा सयंत्रे बसवली आहेत. त्यामुळे नगरपालिकेतील सर्व इलेक्ट्रीक उपकरणे सौर ऊर्जेवर चालणार असून आणखी वीज बचत होणार असल्याची माहिती नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी दिली.

पालिका इमारतीवर बसवलेल्या सयंत्रांचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. यावेळी बांधकाम सभापती हणमंत पवार, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, बाळासाहेब यादव, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव,राजेंद्र  माने  लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, वैभव हिंगमिरे, विद्या पावसकर, सुहास जगताप, फारुक पटवेकर, मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगरअभियंता एम. एच. पाटील, विद्युत पर्यवेक्षक धन्वंतरी साळुंखे आदी उपस्थित होते.

सातारा जिल्हयात सर्वप्रथम शासनाकडून कराड नगरपालिकेस 100 टक्के अनुदानातुन हा सौर ऊर्जा प्रकल्प देण्यात आला आहे. यामुळे पालिकेच्या जुन्या व नव्या इमारतीचे सुमारे 40 ते 50 हजार रुपयांचे वीज बिल वाचणार आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये होणारा वीज वापर कमी करण्यासाठी राज्य शासनाने 2013 साली अपारपरिक ऊर्जेचा प्रसार व प्रचार करण्यासाठी महिनगरपालिका, नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालये, जिल्हा परिषदांच्या इमारतींवर सौर ऊर्जा संच बसवण्याची योजना आखली होती. विशेष म्हणजे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणतर्फे 100 टक्के अनुदानावर हा प्रकल्प देण्यात आला आहे.

नगरपालिकेने या योजनेचा लाभ घेण्यासाठी ठराव करुन शासनास पत्र दिले होते. त्यानुसार गेल्या डिसेंबर महिन्यात पालिकेस हा प्रकल्प देण्यात आला.त्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, मुख्याधिकारी यशवंत डांगे, विद्युत पर्यवेक्षक धन्वंतरी साळुंखे यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे.