Tue, Jul 16, 2019 21:48होमपेज › Satara › पालिकेची झाडांवर कुर्‍हाड 

पालिकेची झाडांवर कुर्‍हाड 

Published On: Jan 19 2018 1:58AM | Last Updated: Jan 18 2018 10:40PMकराड : प्रतिनिधी

थकून भागून आलेले शालेय विद्यार्थी, प्रवाशी कोल्हापूर नाक्यावर ज्या झाडांखाली घटकावर थांबत होते, त्याच झाडांवर गुरुवारी कराड पालिकेने  कुर्‍हाड चालवली. 

या प्रकाराने पर्यावरणप्रेमींसह या झाडांचे पालन पोषण करणार्‍या कै. यशवंतराव चव्हाण रिक्षा गेटवरील रिक्षाचालकांनी आक्रमक पवित्रा घेत पालिका प्रशासनावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. 

रिक्षाचालकांनी त्या ठिकाणी वड व पिंपळाची झाडे लावली होती. बाटलीने पाणी घालून त्या झाडांचे पालन पोषण रिक्षाचालकांनी चांगल्या पद्धतीने केले होते. गुरुवारी सकाळी सातच्या समारास कराड पालिकेच्या कर्मचार्‍यांनी ही दोन्ही झाडे जेसीबीच्या साहाय्याने मुळासकट काढून टाकली. याची कसलीच कल्पना देण्यात आली नव्हती, की याबाबत पालिकेत चर्चा झाली होती. ही झाडे का काढताय याची विचारणा रिक्षा चालकांनी केली मात्र त्याचे समाधानकारक उत्तर कर्मचार्‍यांना देता आले नाही. काही मिनिटात ही दोन्ही झाडे जेसीबीच्या सहाय्याने मुळासकट काढून टाकण्यात आली. 

दरम्यान रिक्षा गेटचे अध्यक्ष राजू आतार, सचिन जांभळे, जितेंद्र जांभळे, अनिल भोसले, संजय खराडे, किरण धुमाळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पर्यावरण प्रेमी नाना खामकर, रोहन भाटे, नगरसेवक सौरभ पाटील, एन्व्हायरो नेचर क्लबचे अध्यक्ष व वृक्ष प्राधीकरण समिचे सदस्य  प्रा. जालिंदर काशिद त्या ठिकाणी आले. हा प्रकार चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रिक्षाचालकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.