Mon, May 20, 2019 22:46होमपेज › Satara › कराड पालिकेला राज्य शासनाचे ‘हरित महासिटी कंपोस्ट प्रमाणपत्र’ 

कराड पालिकेला राज्य शासनाचे ‘हरित महासिटी कंपोस्ट प्रमाणपत्र’ 

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 05 2018 9:20PMकराड : प्रतिनिधी

कराड नगरपालिकेच्यावतीने येथील बारा डबरी परिसरात सुरू करण्यात आलेल्या कंपोस्ट खत प्रकल्पास राज्य शासनाचा ‘हरित महा सिटी कंपोस्ट’ प्रमाणपत्र दिले आहे.  

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कराड नगरपलिकेने विलगीकरण केलेल्या विघटनशील घनकचर्‍यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात येत आहे. शहरातील सर्व कचरा गोळा करताना त्याचे विलगीकरण करण्यात येते. सर्व कचरा गोळा करून येथील बारा डबरी परिसरात नेल्यानंतर या कचर्‍याचे पुन्हा व्यवस्थित विलगीकरण करण्यात येते. त्यानंतर कचरा मोठ्या चाळणीतून चाळण्यात येतो व त्यानंतर लहान चाळणीतून चाळण्यात येतो.

ही प्रक्रिया  केल्यानंतर हा कचरा खतासाठी योग्य होतो. या खताचा वापर शेतकरी शेतासाठी करत आहे. गेल्या वर्षभरापासून कंपोस्ट पीठ तयार करण्यात आले असून या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगरसेवक विजय वाटेगावकर, अभियंता ए. आर. पवार, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी यासाठी परिश्रम घेतले आहेत. 

या प्रकल्पामुळेे शहरातील कचराही तत्परतेने उचलला जात असून  शहर स्वच्छ होत आहे.  शहराचा विस्तार वाढत चालला असून कचर्‍याचाही प्रश्‍न तितकाच गंभीर आणि जटील बनत चालल्याने याचा विचार करून पालिकेच्यावतीने हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून यामुळे पालिकेच्या उत्पन्नातही भर पडत आहे. हे प्रमाणपत्र शुक्रवारी होणार्‍या स्वच्छ सर्वेक्षण आढावा बैठकीत देण्यात येणार आहे. 

एक वर्षापूर्वीपासून प्रयत्न 

नगरसेवक विजय वाटेगावकर यांनी आरोग्य सभापती असताना या कंपोस्ट खतासाठी अतिशय परिश्रम घेतले आहेत. एक वर्षापूर्वी कचरा डेपो मुक्‍त क रण्यासाठी काय करावे लागेल यावर अभ्यास सुरू केल्यानंतर वाहने, मनुष्यबळ निर्माण केले. त्यानंतर कंपोस्ट खत तयार करण्यासाठी कंपोस्ट पीठ तयार केले. त्याचा रिझल्ट चांगल्याप्रकारे आल्यानंतर कंपोस्ट खताची सुरूवात करण्यात आली.