Sat, Apr 20, 2019 18:23होमपेज › Satara › आईसह भावाचा संपत्तीसाठी निर्घृण खून

आईसह भावाचा संपत्तीसाठी निर्घृण खून

Published On: Apr 10 2018 1:13AM | Last Updated: Apr 10 2018 12:30AMकराड : प्रतिनिधी

वडिलोपार्जित बंगल्याच्या वाटणीवरून चिडून जाऊन मलकापूर (ता. कराड) येथे थोरल्या भावाने धाकट्या भावासह आपल्या आईचा गुप्‍तीने जवळपास 20 ते 25 वार करून, तसेच डोक्यात लोखंडी पाईप, वीट मारून निर्घृण खून केल्याची धक्‍कादायक घटना घडली. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास लोकांसमोर भरवस्तीत घडलेल्या या थरारनाट्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयिताला घटनास्थळावरून ताब्यात घेत अटक केली आहे. 

याप्रकरणी अलंकार शामराव जोशी (रा. सोमवार पेठ, कराड) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. राजेश गजानन घोडके व जयश्री गजानन घोडके असे खून झालेल्या दुर्दैवी मायलेकांची नावे आहेत. तर राकेश गजानन घोडके असे संशयिताचे नाव असून फिर्यादी जोशी हे घोडके कुटुंबीयांचे जावई आहेत. अलंकार जोशी यांचे मेव्हणे राजेश घोडके हे इस्लामपूर येथे भूमिअभिलेख  कार्यालयात नोकरीस असून ते पत्नी व आपल्या दोन मुलींसह इस्लामपूरमध्येच वास्तव्यास होते. तर त्यांची आई जयश्री घोडके व थोरला भाऊ राकेश हे आगाशिवनगरमधील आझाद कॉलनीतील श्रीराम निवास या बंगल्यात वास्तव्यास आहेत. दोन वर्षांपूर्वी   

गजानन घोडके यांचे निधन झाले असून ते नायब तहसिलदार या पदावर कार्यरत होते. निवृत्तीनंतर मिळालेले सर्व पैसे आई व धाकट्या भावाच्या नावावर ठेवल्याचा राकेश याला राग होता. तसेच आगाशिवनगरमधील बंगल्याचा वरचा मजला आपला असून खालच्या मजल्यावरही आपणाला वाटणी हवी आहे, अशी मागणी तो करत होता. याच ठिकाणी जयश्री घोडके एकट्याच राहत होत्या. तर वरच्या मजल्यावर संशयित राकेश आपल्या पत्नी व दोन मुलींसह वास्तव्यास होता. 

याच वाटणीवरून चार वर्षापासून घोडके कुटुंबियांत वारंवार वाद होत होता. अशाच एका प्रसंगात आईने चप्पल मारल्याचा राग राकेश याच्या मनात होता. हा राग व संपत्ती वाटून न देण्याच्या कारणावरून राकेश याने आईसह धाकट्या भावाचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास राजेश घोडके हे उठल्यानंतर अंगणात आले होते. याचवेळी अचानकपणे राकेश याने त्यांच्यावर गुप्‍तीने वार केला. तसेच वीट व त्याच ठिकाणी असलेली लोखंडी पाईप डोक्यात घालत राजेश याला गंभीर जखमी केले.

यावेळी झालेला आरडाओरडा ऐकून जयश्री घोडके या घराबाहेर आल्या असता त्यांच्यावरही राकेश याने हल्‍ला चढवला. राकेश याने राजेश याच्यासह आईवर गुप्‍तीने जवळपास 20 ते 25 वार केले. तसेच लोखंडी पाईपने मारल्याचे व वीटही डोक्यात घातल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान याचवेळी राकेश याची पत्नी ऋतुजा या बाहेर आल्या असता त्यांच्यावरही त्याने लोखंडी पाईपने हल्ला केला. त्यामुळे ऋतुजा यांनी थेट पोलिस स्टेशन गाठत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी कायदेशीर सोपस्कर पार पाडत सोमवारी दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
 

 

tags :  Karad,news,Mother, and,brother's, murder ,