Fri, Jul 19, 2019 07:10होमपेज › Satara › रस्त्यावरील मंडईतही व्यापार्‍यांनीच धरल्या जागा 

रस्त्यावरील मंडईतही व्यापार्‍यांनीच धरल्या जागा 

Published On: Mar 03 2018 1:43AM | Last Updated: Mar 02 2018 11:03PMकराड : प्रतिनिधी 

मलकापूर भाजी मंडईचा प्रश्‍न  भिजत पडला आहे. ज्यांच्यासाठी उपोषण झाले त्या शेतकर्‍यांनाही न्याय मिळालेला नाही. शेतकर्‍यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सरकारी जागेतही व्यापार्‍यांनी अतिक्रमण केले असून पोती व गोणपाट टाकून तेथील जागा आरक्षित केल्या जात असल्याने शेतकर्‍यांना कोणी वाली नाही याचाच प्रत्यय येत आहे. मलकापूर येथील भाजी मंडई गेल्या दहा वर्षापासून खाजगी जागेत भरत आहे. शेतकर्‍यांना त्या जागेचा त्रास नव्हता. मात्र गेल्या आठवड्यात ही खाजगी ठिकाणची मंडई विनापरवाना असल्याने ती बंद करण्यात यावी अशी मागणी नगरपंचायत कार्यालयात झाली.

त्या मागणीनुसार नरगपंचायतीने खासगी जागेतून मंडई बंद करून तात्पुरती मंडई नगरपंचायत कार्यालयासमोर भरविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नगरपंचायतीसमोर बोर्डही लावण्यात आला. पण बाहेरून येणार्‍या शेतकर्‍यांना मलकापूर  फाट्यावर शेतमालाच्या पाट्या उतरून त्या नगरपंचायत कार्यालयापर्यंत नेण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे त्यांनी या नव्या जागेवर जाण्याचे टाळले.

शेतकर्‍यांचे नुकसान होवू नये म्हणून नगरपंचायतीने महामार्गालगत नगरपंचायत हद्दीतील रोडवर शेतकर्‍यांना भाजी विक्रीस बसण्यास परवानगी दिली. पण त्या जागेवरही व्यापार्‍यांनी अतिक्रमण केले आहे. सकाळी दहा पासूनच व्यापारी पोटी टाकून जागा आरक्षित करत आहेत. त्यामुळे बाहेरगावाहून या ठिकाणी शेतमाल घेवून येणार्‍या शेतकर्‍यांची मोठी कुचंबना झाली आहे. महामार्गाचे अधिकारी शेतकर्‍यांना बसू देत नाहीत तर नगरपंचायतीने दिलेल्या जागेत व्यापारी बसू  देत नाही अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सााडला आहे.