Sat, Apr 20, 2019 08:30होमपेज › Satara › शहरातील कचरा कोंडावळा नष्ट

शहरातील कचरा कोंडावळा नष्ट

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 25 2018 7:59PMकराड : प्रतिभा राजे

स्वच्छता अभियानाच्या विविध उपक्रमात सहभागी होत आतापर्यंत कराडमध्ये कचरामुक्‍तीची यशस्वी  वाटचाल सुरू आहे. शहरात सध्या एकाही ठिकाणी कचरा कोंडावळा व कचरा पसरण आढळत नसून कचरा पूर्णपणे नष्ट करण्यात आला आहे. कचरा मुक्‍तीसाठी आतापर्यंत राबवण्यात आलेल्या पर्यायामुळे हे शक्य झाले असून राज्यभरात कचरामुक्‍त झालेले कराड शहर पहिले ठरणार आहे. 

शहरातील दत्त चौक, कार्वे नाका, कोल्हापूर नाका, स्मशानभूमी, कृष्णा नाका, भाजी मंडई या ठिकाणी कचरा साठवण्यासाठी कचरा कुंडी ठेवण्यात आली होती. असे असतानाही याठिकाणी कचरा पसरलेलाही दिसून येत होता. शहराचे प्रवेशद्वार असणारा कोल्हापूर नाका कचर्‍यामुळे गलिच्छ दिसायचा. शहरातील अनेक ठिकाणी कचरा कुंड्यांमधून दुर्गंधी निर्माण व्हायची, यासाठी याठिकाणच्या कचरा कुंड्या उचलण्याचा निर्णय नगरसेवक विजय वाटेगावकर, पालिका अधिकारी, पदाधिकारी यांनी घेतला.  प्रारंभी नागरिकां याबाबत नाराजी व्यक्‍त केली. मात्र त्यांना याबाबतचे महत्व पटवून दिल्यावर सध्या हा निर्णय योग्य असल्याचे नागरिक येऊन सांगतात, असे वाटेगावकर यांनी सांगितले. 

शहरात आता कचरा कुंडी कोठेही ठेवण्यात आलेली नाही. यासाठी घंटागाड्या वाढवण्यात आल्या, ट्रॅक्टरमध्ये वाढ करण्यात आली. घंटागाड्या कमी असल्याने कचर्‍याचे कोंडावळे वाढत चालले होते. आता कचरा दिसला की घंटा गाडी शहरातून फिरत असल्याने गाडीत कचरा टाकला जातो. त्यामुळे शहर कचरामुक्‍तीबरोबरच कचरा कुंडीमुक्‍त झाले आहे. नागरिकांना कचरा दिसला की त्यांनी एक फोन करून पालिकेत कळवले की त्वरित गाडी पाठवली जाते. पूर्वी ज्या ठिकाणी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. त्याठिकाणची जागा स्वच्छ करून त्याठिकाणी रांगोळी काढण्यात आली आहे. 

शहरातील छत्रपती शिवाजी भाजी मंडई व छत्रपती संभाजी मंडई, बैल बाजार याठिकाणी मात्र कचरा कुंडी ठेवण्यात आली आहे. याठिकाणी दररोज ओला, सुका कचरा साचत असल्याने कचरा पसरू नये, यासाठी कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. 

कचरा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी काय करता येईल याचा आम्ही अभ्यास केला व त्यानंतर कुंड्या काढण्याचा निर्णय घेण्यात आला. घंडा गाड्या सतत कार्यरत असल्याने कुंड्या ठेवल्या नाहीत तर कचरा कोठे टाकायचा हा प्रश्‍न आता नागरिकांपुढे निर्माण होत नाही. 
-  विजय वाटेगावकर, नगरसेवक