Fri, Apr 26, 2019 09:53होमपेज › Satara › स्वच्छ सर्वेक्षणात मलकापूरची आघाडी

स्वच्छ सर्वेक्षणात मलकापूरची आघाडी

Published On: Feb 14 2018 2:56AM | Last Updated: Feb 13 2018 8:57PMकराड  : प्रतिनिधी

देशभर राबविले जात असलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये मलकापूरने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायतीचे पदाधिकारी व अधिकार्‍यांचे परिश्रम आणि त्यांना मिळालेल्या नागरिकांच्या सहकार्यामुळे संपुर्ण शहर चकाचक दिसत आहे. त्यामुळेच मलकापूर स्वच्छता सर्व्हेखणाते संपुर्ण देशात झेंडा फडकेल, असा विश्‍वास शहरवासियांमधून व्यक्‍त केला जात आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’मध्ये देशातील 4051 शहरांचा समावेश  असून हे सर्व्हेक्षण सुरु झाले तेंव्हा मलकापूरचा क्रमाक 109 वा होता. देशात पहिल्या 25 शहरांमध्ये येण्याचा पदाधिकार्‍यांसह अधिकारी व नागरिकांनी ध्यास घेतला आहे. त्यासाठी प्रयत्न सुरु असून पहिल्या टप्प्यात मलकापूरने चांगले यश मिळविले आहे. स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून फिडबॅक देण्यामध्ये मलकापूरचा देशात 17 क्रमांक आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

नगरपंचायतीने लोकसहभागातून हाती घेतलेल्या विविध नाविण्यपुर्ण योजनांमुळे मलकापूरचा समावेश स्वच्छता सर्वेक्षणात झाला असून नागरिकांचा समावेश तितकाच महत्वाचा आहे. त्यासाठी ‘मी मलकापूरचा विचार करतो देशाच्या स्वच्छतेचा’ अशी नागरिकांची भावना झाली आहे. त्यामुळेच मलकापूर स्वच्छता अभियानात  अग्रस्थानी राहील, असा विश्‍वास उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी व्यक्‍त केला.

मलकापूरमध्ये लोकसहभागातून राबविलेल्या सर्व योजना यशस्वी झाल्या आहेत. त्याप्रमाणे ‘स्वच्छता सर्व्हेक्षण’ही यशस्वी करण्यासाठी शहरातील नागरिकांच्या सहकार्यांने नगरपंचायतीचे पदाधिकारी व अधिकार्‍यांचे प्रयत्न सुरु आहे. या मोहिमेत स्वच्छतेविषयी 4 हजार गुण आहेत. त्यापैकी 1400 गुण हे सेवास्तर प्रगतीसाठी आहेत. त्यामध्ये घनकचरा संकलन व वाहतुक, प्रक्रिया व विल्हेवाट, स्वच्छता व हागणदारी मुक्तता, माहिती शिक्षण व संवाद, क्षमता बांधणी नियोजन, अभिनव उपक्रम यांचा समावेश आहे. तसेच नागरिकांच्या अभिप्रायाकरिता 1400 गुण आहेत. यामध्ये 1 हजार गुणांसाठी स्वच्छता समिती थेट नागरिकांशी संवाद साधून अभिप्राय घेणार असून  400 गुण हे स्वच्छता अ‍ॅपसाठी आहेत. तर प्रत्येक्ष पाहणीसाठी 1200 गुण आहेत.

मोहिमेच्या यशस्वीतेसाठी शहरातील सर्वस्तरातील घटकांनी सहभाग घेतला आहे. त्यामध्ये 10 जि. प. शाळा, 14 खासगी विद्यालये व महाविद्यालये, 22 अंगणवाड्यांचाही समावेश आहे. पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, गणेश मंडळे, ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक, शालेय विद्यार्थी यांच्या माध्यमातून शहर स्वच्छ केले जात आहे. तसेच नगरपंचायतीच्या कर्मचार्‍यांना स्वच्छता संदेश देणारे गणवेश व टोप्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय स्वच्छता संदेश देणारे फलक लावले असून वर्दळीच्या ठिकाणाच्या भींती रंगवून स्वच्छता संदेश दिला आहे. तसेच स्वच्छतादूतांचीही नेमणूक केली आहे.