Sat, Mar 23, 2019 12:03होमपेज › Satara › कराडात १०५ जण हद्दपार

कराडात १०५ जण हद्दपार

Published On: Apr 14 2018 1:29AM | Last Updated: Apr 13 2018 10:37PMकराड : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या पार्श्‍वभूमीवर कराड तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. तालुक्यातील 104 जणांना 18 एप्रिलपर्यंत तात्पुरते हद्दपार करण्यात आले आहे. तर शेरेतील एकाला सहा महिन्यांसाठी कराड तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. 

शनिवारी (दि. 14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी होत आहे. त्याचबरोबर 15 एप्रिलपासून 18 एप्रिलपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली जाणार आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी शांतता समिती तसेच विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेत चर्चा केली आहे. या बैठकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर कार्यवाहीचे संकेत देण्यात आले होते.

त्याप्रमाणे प्रत्यक्ष अंमलबजावणी करत फौजदारी दंड संहिता कलम 144(2) अन्वये 104 जणांविरुद्ध तात्पुरत्या हद्दपारीची कार्यवाही करण्यात आली आहे. तर शेरे येथील सतीश मदने याला तालुक्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आल्याचे पोलिस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांनी सांगितले. दरम्यान, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अन्य 170 लोकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येऊन त्यांना लेखी समज देण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.