Fri, Aug 23, 2019 22:18होमपेज › Satara › कोंजवडे-बेंदवाडी धोकादायक घाट

कोंजवडे-बेंदवाडी धोकादायक घाट

Published On: Jun 29 2018 12:00AM | Last Updated: Jun 28 2018 8:36PMतारळे : एकनाथ माळी 

गत पंधरावड्यात तारळे विभागातील कोंजवडे-सवारवाडी या दरम्यानच्या अरुंद व धोकादायक घाट रस्त्यावर रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने चालवलेला ट्रॅक्टर  सुमारे दोनशे फूट दरीत कोसळून दोघांचा जीव गेला. मुळात घाटरस्त्याचे कामच चुकीच्या पद्धतीने झाले असून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याचे निकृष्ट कामही तितकेच कारणीभूत असल्याची चर्चा आहे.यापूर्वी दोन वेळा अरुंद व धोकादायक रस्त्यामुळे दोन ट्रॅक्टर दरीत कोसळले चालकांनी प्रसंगावधान दाखवल्याने जीवित हानी टळली असली तरी तिसर्‍या वेळी मात्र दोघांवर काळाने घाला घातला. 

कोंजवडे-बेंदवाडी या आठ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काम पूर्ण झाले आहे.यासाठी जवळपास सव्वादोन कोटी रुपयांचा चूराडा झाला आहे.डोंगर फोडून घाट रस्ता बनवला आहे.पण रस्त्याच्या कामात मोठा गफला करण्यात आल्याची चर्चा आहे. या रस्त्यावरून सवारवाडी, बेंदवाडी, माळवाडी व मोगरवाडी या गावातील लोकांची रहदारी असते.यापूर्वी दळणवळणाच्या सोईअभावी डोंगरावर राहणार्‍या या गावातील लोकांचे जीवन मागासलेपणाचे झाले होते. शिक्षण, आरोग्य व इतर जीवनावश्यकसोईसुविधा मिळवताना अनेक अडचणी येत होत्या.त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थांमधून रस्त्याची मागणी करण्यात येत होती.त्यानंतर कोट्यवधींचा निधी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत टाकण्यात आला.

जवळपास संपूर्ण रस्ता डोंगर फोडून बनविण्यात आला आहे.एका बाजूला उंच डोंगर तर दुसर्‍या बाजूला शेकडो फूट दरी असे चित्र आहे.तसेच ज्या ठिकाणी अपघात झाला आहे त्यापरिसरामध्ये अनेक वेळा पावसामुळे खचला आहे त्यामुळे साईडपट्ट्याच अस्तित्वात दिसून येत येत नाहीत. पावसाळ्यात देवावर हवाला ठेवून धोकादायक पद्धतीने प्रवास सुरु असतो.

रस्त्याच्या उंचीपेक्षा  पूलांची उंची कमी ठेवल्याने पूलाच्या बाजूच्या भिंतीवरील भराव वाहून गेल्याने त्या पुलालाही धोका निर्माण झाला असून त्याची झळ रस्त्याला बसणार आहे.डोंगरातील रस्ता असून त्यावरील पूल व साईडपट्टी मजबूत राहण्यासाठी प्रयत्न करण्यात अधिकारी अपयशी झाल्याचे दिसून येत आहे.काम सुरु असताना वेळोवेळी प्रवाशांनी अधिकारी व ठेकेदाराला सूचना दिल्या. परंतु त्याचे पालन न केल्यामुळे  एवढ्या मोठा रस्ता प्रवाशांच्या जीवावर उठला नसता. रस्त्याच्या रुंदीच्या बाबतीतही प्रवाशांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील  डांबरी रस्त्याची रुंदी गावातील पाणंद रस्त्यापेक्षा कमी असल्याचा आरोप होत आहे.त्या परिसरामध्ये अतिवृष्टी होत असल्याने डोंगरावरून लहानमोठे दगड, माती लगतल्या नाल्यात साठून रहात आहे.त्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावरुन व साईडपट्टीवरुन वाहून रस्त्याला धोका निर्माण करत आहे. दोन वर्षापासून नाल्यातील राडारोडा न काढल्याने तो तसाच पडून आहे.याच काही देण घेण अधिकार्‍यांना नाही.

यापूर्वी दोन वेळा कोंजवडे-बेंदवाडी  या घाट रस्त्यावर अपघात झाले होते. सुदैवाने यात जिवीतहानी झाली नाही.पण नुकत्याच धावत्या वाहनात दोघांचा बळी गेला आहे.रस्त्याची अवस्था बघता भविष्यात असा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे निदान आता तरी रस्त्यातील सर्व त्रुटी दुर करण्यासाठी प्रयत्न करावेत.अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.निदान या पुढे तरी अधिकार्‍यांनी बोटचेपी भूमिका न घेता दर्जेदार कामे करून घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.