फलटण : प्रतिनिधी
कठुआ, उन्नाव, सुरत येथील बलात्काराच्या घटनांमुळे महिलांचे जीवन उध्वस्त होत आहे. याविरोधात केंद्र व राज्य शासनाने अशा नराधमाविरुध्द कडक उपाययोजना करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी असा कायदा करावा या मागणीसाठी आज गुरुवार (दि. 19) सायंकाळी 6 वाजता कँडल मार्च काढण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या कँडल मार्च सुरुवात करण्यात आली. या कँडल मार्च मध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी महिला व मुले मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेल्या या कँडल मार्च मध्ये नगराध्यक्षा सर्व महिला नगरसेविका, शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, हणमंतराव पवार हायस्कुल, ब्रिलीयंट अकॅडमी स्कूल, श्रीराम बाजार व सद्गुरू हरीबुवा उद्योग समूहातील संस्था सहभागी झाल्या होत्या .
हा मोर्चा डेक्कन चौक मार्गे महात्मा ज्योतिबा फुले चौकात आला. यानंतर तहसीलदार विजय पाटील यांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले. तर यावेळी बलात्कार करणाऱ्या अशा नराधमांना केंद्र सरकारने कडक शिक्षा देवून फाशीची शिक्षा द्यावी अशा घोषणा देण्यात आल्या. तर "आता आम्हाला जगू द्या बस झाले आता आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे" व नारी शक्तीचा विजय असो अशा घोषणानी परिसर दणाणून सोडला.