Sat, Feb 23, 2019 01:59



होमपेज › Satara › कामेरी, वेणेगाव, कोपर्डेत राजरोस वाळू उपसा 

कामेरी, वेणेगाव, कोपर्डेत राजरोस वाळू उपसा 

Published On: Dec 11 2017 1:35AM | Last Updated: Dec 10 2017 10:54PM

बुकमार्क करा





वेणेगाव : वार्ताहर

सातारा तालुक्यात कामेरी येथे राजरोसपणे वाळू उपसा सुरू असून नदीपात्राचा नक्षाच बदलला आहे. कोपर्डे, वेणेगाव येथेही छुप्या पद्धतीने बेकायदा वाळू उपसली जात असल्यामुळे पर्यावरणाचीही हानी होत आहे. गौन खनिज विभागाचा महसूल बुडत असून याप्रश्‍नी संबंधीत ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे. 

सातारा तालुक्यातील काही भागात कृष्णा नदीच्या पात्रातून  बेसुमार वाळू उपसा होत आहे. अनेक ठिकाणी ठेकेदारांनी नदीपात्राचे लचके तोडले आहेत. सर्कल, तलाठी, कोतवाल, पोलिस पाटील हे घटक गावपातळीवर महसूल विभागाचे प्रमुख असतानादेखील छुप्या पद्धतीने वाळू उपसा सुरू आहे. कामेरी गावात  यंत्रणा आमच्या दावणीला बांधली असल्याच्या अविर्भावात वाळू ठेकेदारांचे वातावरण बघायला मिळत आहे. कामेरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात काही दिवस वाळू उपसा बंद होता. मात्र आता बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. संबंधीत ठेकेदारांनी नदीपात्राची अक्षरश: वाट लावली आहे. 

वेणेगाव व कोपर्डे येथेही ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशा पद्धतीने ठेकेदारांची वाळू उपसा केला आहे.  छुप्या पद्धतीने सोयीनुसार वाळू उपसा करून रात्री ऊशीरा वाळू वाहतूक सुरू असते. वाळू व्यतिरिक्त कोपर्डे येथील ग्रामपंचायत मालकीच्या कानबाचा माळाजवळील सामाजिक  वनीकरणातील क्षेत्रातील तसेच शिधोबाच्या माळातील जागोजागी मुरूमाचे उत्खनन केले जात आहे. मात्र याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष होत असल्याने महसूल विभागाच्या कारभाराबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्रीय हरित लवादाकडून यांत्रिक बोटीकडून वाळू उपसा बंदीवर मातीमिश्रीत वाळूउपसा या संज्ञेचा जावई शोध लागला असल्याने रितसर वाळू उपशाच्या नावाखाली अक्षरश : कृष्णा नदीत लयलूट केली जात आहे. 

कोपर्डे गावात काही दिवसांपूर्वी वाळूवरूनच दोन गटात हमरीतुमरी झाली होती. ही भांडणे मिटविण्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिकांना उपस्थित राहावे लागले होते. कामेरीसह वेणेगाव, कोपर्डे, तुकाईवाडी, कालगाव, दुर्गळवाडी परिसरात या वाळू वाहतुकीने रस्त्याचे कंबरडे मोडले आहे. या अनाधिकृतपणे सुरू असणार्‍या वाळू उपशावर महसूल विभागाने निर्बंध ठेवावे, अशी मागणी होत आहे.