Thu, Jun 27, 2019 12:10होमपेज › Satara › बेड्यांसह तो ‘तडीपार’ पसारच

बेड्यांसह तो ‘तडीपार’ पसारच

Published On: Jan 25 2018 1:01AM | Last Updated: Jan 24 2018 10:06PMसातारा : विठ्ठल हेंद्रे

तडीपारीतील गुंड कैलास नथू गायकवाड (वय 20, रा. नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा) हा शाहूपुरी पोलिस ठाण्यातून दि. 1 जानेवारी रोजी बेड्यांसह पसार होऊन 24 दिवस उलटल्यानंतरही अद्याप सापडला नसल्याने पोलिसांच्या तपासाचे तीनतेरा वाजले आहेत. तडीपारीच्या आदेशाचे उल्‍लंघन केल्यानंतर एलसीबीने त्याला अटक केली होती. दरम्यान, संशयितावर मर्डरसह अनेक गुन्हे दाखल असून त्याला डिसेंबरमध्ये तडीपार केले होते.

संशयित कैलास गायकवाड हा सातार्‍यातील रहिवासी असून त्याच्यावर एक हाफ मर्डरचा, मारामारीचे दोन व घरफोडीचे सहा असे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. दि. 22 डिसेंबर 2017 रोजी त्याला 1 वर्षासाठी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी तडीपार केले होते. कैलास तडीपारीत असतानाच 1 जानेवारी रोजी तो सातार्‍यात एका बीअर बारमध्ये दारू पित असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. एलसीबी पोलिसांनी शिताफीने सापळा रचून वर्षाच्या पहिल्याच दिवशी तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कैलास गायकवाड याला ताब्यात घेतले.     

एलसीबी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कागदांचे सोपस्कार करुन त्याला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. शाहूपुरी पोलिसांनी त्याचा ताबा घेवून संशयिताला पोलिस ठाण्यात बेड्या घालून बसवले होते. त्यावेळी कैलासने भूक लागल्याचे पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला वडापाव आणून दिला. वडापाव खाण्यासाठी त्याच्या हातातील बेड्या पोलिसांनी मोकळ्या केल्या.

याचदरम्यान, पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी इतर काही लोक शाहूपुरी पोलिस ठाण्यात आले. आलेल्या तक्रारदारांकडे पोलिसांचे लक्ष राहिल्याने हीच संधी कैलास याने साधली. पोलिसांचे लक्ष नसल्याचे पाहून तो  तेथून रफूचक्‍कर झाला. तक्रार देण्यासाठी आलेला जमाव पोलिस ठाण्यातून निघून गेल्यानंतर पोलिसांना कैलास गायकवाडची आठवण झाली मात्र, तोपर्यंत तो पसार झाला. या घटनेने पोलिसांना चांगलाच घाम फुटला. परिसरात, आजूबाजूला सर्वत्र शोध घेवून नाकाबंदीही लावण्यात आली. मात्र, तरीही तो सापडला नाही.

वर्षाच्या पहिल्याच दिवशी तडीपारीतील संशयित आरोपी बेड्यासह पोलिस ठाण्यातून पळून गेल्याने पोलिस दलात खळबळ उडाली. एलसीबीच्या पथकाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तेही चक्रावून गेले. संशयित आरोपी पळून गेल्याने त्याची जोरदार चर्चा रंगली. पोलिस गांभीर्याने बेड्यासह संशयिताचा शोध घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र घटना घडून एक महिना होत आला तरी संशयित सापडत नसल्याने पोलिस तपासाबाबत किती गंभीर आहेत? हेच समोर आले आहे.

कुठूनही जावा.. कुठूनही बाहेर पडा..

शाहूपुरी पोलिस ठाण्याला कोठडीची जागा नसल्याने पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यातील एका खोलीत बेड्या घालून बसवले होते. शाहूपुरी पोलिस ठाण्याची इमारत खासगी असल्याने त्याला चारही बाजूने जाण्यासाठी दरवाजे आहेत. एका खोलीतून दुसर्‍या खोलीत सहजपणे जाता येते. याशिवाय इमारतीमध्ये आत जाण्यासाठी एकूण तीन वेगवेगळे मार्ग आहेत. संशयित कैलास गायकवाड याला पळून जाण्यासाठी हेच पथ्यावर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.