Wed, Feb 26, 2020 22:06होमपेज › Satara › ‘कडकलक्ष्मी’ दुर्मीळ; अंधश्रद्धेला मूठमाती

‘कडकलक्ष्मी’ दुर्मीळ; अंधश्रद्धेला मूठमाती

Published On: Feb 09 2019 1:44AM | Last Updated: Feb 08 2019 11:02PM
कण्हेर : बाळू मोरे

‘या या या मरिआईला पुजायला या’, अशी आरोळी आता दुर्मिळ होवू लागली आहे. आजकालच्या हायटेक जमान्यात लोकांमध्ये शिक्षण व आधुनिकतेचे वारेही वेगाने वाहू लागले आहे. त्यामुळे महिला वर्गही मरिआईकडे (पोतराज) पहिल्यासारखा फिरकत नसल्याचे चित्र आता ग्रामीण भागात दिसत आहे. सध्याचा समाज शिक्षित होत असल्याने अंधश्रध्देेला मूठमाती मिळत असल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. 

पायात घुंगरू, कमरेला रंगीबेरंगी गुंडाळलेली फडकी, कपाळ व दंडाला हळदी कुंकवाचा पट्टा, हातात मोठा चाबूक अशा वेषात मरिआई (पोतराज) व त्यांचा ताफा येत असतो. मरिआईच्या मागे तिची पत्नी, तिच्या डोक्यावर आठ ते दहा किलो देवीचा देव्हारा, गळ्यात ढोलकी, काखेत लेकरू, अन खांद्याला झोळी, असा सारा लवाजमा घेऊन सकाळी सकाळी गुबूगुबू ढोलकी वाजवत, ’या या पूजेला या’, असे म्हणून मरिआई गावा-गावातून फेरी मारत असते. लोक देतील ते अन्नधान्य व दक्षिणा झोळीत घेऊन मरिआईची स्वारी मार्गस्त होत असते. ढोलकीच्या गुबूगुबू आवाजावर नाचत स्वत:च्या अंगावर चाबकाचे फटके  मारुन घेत असताना पाहिले की बघणार्‍याच्या अंगावर काटाच येतो. 

कडकलक्ष्मी जमातीची ही जोडपी प्राचीन काळापासून आपली परंपरा जपत आहेत. पूर्वी दुष्काळ, अतिवृष्टी, साथीचे रोग आदी संकटे म्हणजे कोपिष्ट देवतांची अवकृपा समजली जायची. काही रोगांची साथ आली की, मरीआईचा कोप झाला असे समजले जायचे. या मरीआईला शांत केल्याशिवाय आपली हानी थांबणार नाही, अशी लोकांची मनोधारणा होती. यासाठी मरीआई (पोतराज) देवीची माफी मागण्यासाठी स्वतःला चाबकाने फोडून लोकांच्या वेदना सहन करण्यासाठी घेत होती. यामुळे लोक आपल्या मर्जीने धान्य दान करून, पैशाच्या रूपात दक्षिणा देत आहेत.

मरिआईची स्वारी दारात आली की पूर्वी ग्रामीण भागात महिला वर्गाचा त्याभोवती गराडा पडायचा. मोठ्या श्रध्देने मरिआईच्या देव्हार्‍याचे पूजन व्हायचे. गावातील लोक विशेषतः लहान मुले बाहेर पडून मरिआई पाहण्यासाठी गर्दी करत होते. गावातील अंगणात मरिआईला पुजायला सुपात धान्य, ओटी, बांगड्या व दक्षिणा घेऊन महिलांची गर्दी होत असायची. मरिआई लोक देखील ते अन्नधान्य व दक्षिणा स्वीकारून लोकांसाठी देवीची पूजा करत असत. शिवाय या देव्हार्‍यातील मरिआईसमोर महिला असलेले नवस बोलून, हळदी-कुंकू वाहून पूजा करत असत.  मात्र अलिकडे समाजात मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाले असून लोक शिक्षीत झाले आहेत. अंधश्रध्दा डोक्यातून निघून जावू लागली आहे. त्यामुळे मरिआईचे पूजन करणार्‍या महिलांची संख्या कमी होताना दिसत आहे. 

पोतराजांना उत्पन्नाचे पर्यायी साधन हवे

अलिकडे मरिआई म्हणजेच पोतराजांना आपल्या उपजीविकेसाठी म्हणावे असे धान्य व पैसे मिळत नसल्याने दिवसेंदिवस ही मरिआई लुप्त होत चालली आहे. बेघर, भूमिहीन, अकुशल व अशिक्षित असलेल्या या भटक्या जमातीच्या लोकांना निवार्‍याबरोबर उत्पन्नाचे पर्यायी साधन मिळणे आवश्यक आहे. याची  शासनाने योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.

मरिआई ही प्रथा पूर्वी श्रध्देचा एक भाग होती. आपली पुरातन काळातील परंपरा जपून ते उपजीविका करत. परंतु सध्याचे लोक या परंपरेला छेद देताना दिसत आहेत. वर्षातून 8 ते 9 महिने गावोगावी फिरणारी मरिआई आता वर्षातून एकदाच फिरत आहे. - ह.भ.प. जयसिंग पवार, जांभळेवाडी.