Mon, Apr 22, 2019 11:42होमपेज › Satara › ‘प्रो’मुळे कबड्डीला ग्लॅमर : विश्‍वासराव मोरे

‘प्रो’मुळे कबड्डीला ग्लॅमर : विश्‍वासराव मोरे

Published On: Dec 04 2017 1:34AM | Last Updated: Dec 03 2017 8:56PM

बुकमार्क करा

कराड : चंद्रजित पाटील

पूर्वीच्या कबड्डीत आणि आजच्या कबड्डीत जमीन - आस्मानचा फरक आहे. कबड्डीला प्रो - कबड्डी स्पर्धेमुळे ग्लॅमर प्राप्त झाले आहे. कबड्डीसह कोणताही मैदानी खेळ ही आयुष्यभराची गुणतंवणूक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळलेच पाहिजेत, असे प्रतिपादन मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे जनरल सेके्रटरी विश्‍वासराव मोरे यांनी केले आहे.

विश्‍वासराव मोरे म्हणाले, प्रो - कबड्डी स्पर्धेबाबत बोलताना सुमारे 17 वर्षांपूर्वी विजयवाडा येथे कबड्डी लीग सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र दुर्दैवाने त्यावेळी प्रतिसादच मिळाला नाही. त्यामुळे ही लीग बंद पडली. त्यांनतर आनंद मंहेद्रा यांनी प्रो - कबड्डीसाठी पुढाकार घेतला. त्यांच्यासह आपण कबड्डी टीव्ही चॅनेलवर दिसावी, म्हणून सोनी सिक्स, सीएनबीसी यासह काही अन्य चॅनेलशी चर्चा केली. मात्र कबड्डी काय खेळ असतो? असे निराशाजनक उत्तर काही ठिकाणी ऐकायला मिळाले. त्यानंतर स्टार स्पोर्टस् चॅनेलने प्रतिसाद देत कबड्डीला ग्लॅमर मिळवून दिले.

केवळ सामने चालू असताना प्रेक्षक येणे आणि त्यांनी सामने पाहण्याने कबड्डी कधीच मोठी झाली नसती. 2010 पर्यंत कबड्डी संपणार की काय? अशी भिती निर्माण झाली होती. मात्र प्रो-कबड्डीमुळे लाखो लोकांमध्ये कबड्डीचा प्रसार आणि प्रचार झाला. त्याचबरोबर आज परदेशातही कबड्डीचा प्रचार आणि प्रसार होऊन हा खेळ अनेक देशांत खेळला जाऊ लागला आहे. आज प्रो - कबड्डीत 12 संघ असून त्यात 25 खेळाडूंचा समावेश असतो. प्रामुख्याने काशिलिंग आडके, निलेश साळुंखे यांच्यासारखे ग्रामीण भागातील खेळाडू आज संपूर्ण देशाला माहित झाले. या खेळाडूूंना चांगले पैसेही मिळतात. अनेक ठिकाणी नोकरीच्या संधीही प्राप्त झाल्या आहेत. 

त्यामुळेच पालकांनी मुलांना मैदानी खेळांची आवड निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मैदानी खेळांमुळे मुले सशक्त राहतात. याशिवाय मैदानी खेळही आयुष्यभराची गुंतवणूक आहे हे ही लक्षात घेतले पाहिजे. मुले त्यामुळे आजारी पडत नाहीत. नेहमी निरोगी राहतात. म्हणून कबड्डीच काय, पण मुलांनी कोणताही मैदानी खेळ खेळला तरी चांगले करिअर करण्याची संधी आज निर्माण झाली आहे, असेही मोरे यांनी सांगितले.