Wed, May 22, 2019 20:17होमपेज › Satara › कासचा हंगाम अति पावसामुळे लांबणार 

कासचा हंगाम अति पावसामुळे लांबणार 

Published On: Aug 21 2018 1:40AM | Last Updated: Aug 20 2018 10:49PMसातारा : प्रवीण शिंगटे 

जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिध्द असलेल्या कास पठारावर सध्या तुरळक प्रमाणात फुले पहावयास मिळत असली तरी पठारावर पावसाचे प्रमाण जास्त आहे तसेच उनही पडत नसल्याने फुले उमलली नाहीत त्यामुळे कास पठार फुलांच्या प्रतिक्षेत आहे. दरम्यान, वन विभाग व संयुक्त वनव्यवस्थापन समितीने कास पठारावर विविध उपाययोजना करण्यास सुरूवात  केली आहे. 

कास पठारावरील दुर्मीळ फुलांचा बहर साधारणत सप्टेंबर ते ऑक्टोबर  या महिन्यात येत असतो. या ठिकाणी येत असलेली फुले दुसरीकडे कोठेही उमलत नाहीत. मात्र दुर्मीळ फुलांमुळे जगाच्या नकाशावर पोहोचलेल्या कास पठारावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पठारावरील फुलांच्या बहराला उभारी मिळत नाही. त्यासाठी  सूर्यप्रकाशाची गरज आहे. मात्र, गेल्या   काही दिवसांपासून पाऊस पडत असल्याने तुरळक प्रमाणात कोठेतरी फुले दिसण्यास सुरूवात झाली आहे.

कास पठारावर कारवी, चवर,  डिप कांडी, श्रावण बाहुली आम्री,  गेंध गवत, सितेची आसवं, स्पंद अशी  विविध प्रकारची फुले पहावयास मिळत आहेत तर यवतेश्‍वर पठारावर मिकीमाऊसची फुले पहावयास मिळत आहेत.

ऊन पडल्यास येत्या काही दिवसात पठार विविध फुलांच्या रंगछटाने बहरण्यास सुरूवात होईल, असे  वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी  सचिन डोंबाळे यांनी सांगितले. फुलांच्या अंदाजानुसार कास पठारावर फुले पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांकडून  टोल आकारण्यात येणार आहे. 

पर्यटकांसाठी घाटाई फाट्यावर पार्कींगसाठी व्यवस्था करण्यात आली. कास पठारावर वाहनांसाठी नो पार्कींग झोन करण्यात आला आहे.  वाहनतळावरून पर्यटकांना कास पठारावर नेण्यासाठी 6 खासगी 17 सीटच्या मिनी बसेस तैनात करण्यात आल्या आहेत. या बसेससंदर्भात वनविभागाने करार केला असल्याचे उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी सांगितले. वाहनतळ, कास पठारावरील टोल नाका व राजमार्ग येथे स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली आहे. पठारावर फुले पाहताना पावसाच्या सरी कोसळण्यास सुरूवात झाली तर कास पठारावरील मुख्य प्रवेशद्वारासमोरील टोल नाक्यावर व राजमार्गावर निवारा शेडची उभारणी करण्यात आली आहे. पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची सोय राजमार्ग, वाहनतळ  व टोलनाक्यावर केली आहे. याशिवाय कास पठारांवरील पर्यटकांना फुलांची माहिती मिळावी यासाठी टोलनाक्यावर पुस्तक विक्री केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

कास पठारावर प्लॅस्टिक पिशव्या व खाद्यपदार्थांना बंदी घालण्यात आली आहे. संयुक्त वनव्यवस्थापन समितीमार्फत कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात येणार आहे यासाठी सुमारे 150 अर्ज  समितीकडे आले असून त्यातून 115 जणांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पठारावर संयुक्त वनव्यवस्थापन समिती, वनविभाग व सातारा- मेढा पोलिस दलांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पठारावरील फुलांची नासधुस पर्यटकांनी केल्यास पर्यटकांवर भारतीय वन अधिनियम 1927 नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सुमारे 500 ते 1 हजार रुपयापर्यंत पर्यटकांना दंड होवू शकतो. पठारावर पर्यटकांसाठी विविध सूचना फलकही लावण्यात  आले आहेत. मुंबई, पुण्यासह  राज्याच्या विविध जिल्ह्यातील पर्यटकांनी   कास पठाराला भेट  दिली. मात्र कुठे तरी तुरळक प्रमाणात पठारावर फुले  होती. पठारावर फुले दिसली नसल्याने अनेक पर्यटकांनी नाराजी दर्शवली. 

पठारावर आता वॉकीटॉकीद्वारे संवाद

कास पठारावर फुलांचा हंगाम बहरण्यास सुरूवात झाल्यानंतर देशी- परदेशी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे संयुक्त वनव्यवस्थापन समिती व वन विभागाच्या कर्मचार्‍यांना गर्दीवर नियंत्रण ठेवताना गोंधळ होत असतो.पठारावर मोबाईल व फोनला नेटवर्क मिळत नसल्यामुळे गैरसोय होत असते. त्यामुळे यावर्षीपासून सुमारे 17 वॉकीटॉकीद्वारे पठारावरील संयुक्त वनव्यवस्थापन समिती व वनविभागाचे कर्मचारी एकमेकांशी संवाद साधणार आहेत.

कास व्हॅली इज व्हेरी ब्युटीफुल

जागतिक वारसा स्थळ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या कास पठाराला दरवर्षी  देश विदेशातील पर्यटक भेट देतात रविवारी चक्क कॅनडाहून काही पर्यटक कासवर अवतरले. त्यावेळी या परदेशी पर्यटकांबरोबर सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरला नाही. रविवारी चक्क कॅनडाहून रिक्षातून हजारो मैल प्रवास करून परदेशी पर्यटक यवतेश्‍वर परिसरात दाखल झाले. कासकडे जाणार्‍या सर्व वाहनांची कसून तपासणी केली जाते. परदेशी पर्यटक आपल्या रिक्षातून कास पठाराकडे निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी रिक्षा थांबवून या पर्यटकांची विचारपूस केली मात्र हे परदेशी पर्यटक इंग्रजीमध्ये बातचीत करत होते. सातारा इज ग्रेट, कास पठार फ्लॉवर्स व्हॅली इज व्हेरी ब्युटीफूल, असेही ते बोलत होते.