Sat, Mar 23, 2019 16:07होमपेज › Satara › पर्यटन हंगामासाठी कासवर पूर्वतयारी

पर्यटन हंगामासाठी कासवर पूर्वतयारी

Published On: Aug 02 2018 2:01AM | Last Updated: Aug 01 2018 9:10PMसातारा : प्रतिनिधी

जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिध्द असलेल्या कास पठारावर सध्या तुरळक प्रमाणात  रानफुलांचे  दर्शन घडू लागले आहे. त्यामुळे संयुक्त वनव्यवस्थापन समिती व वनविभागाच्यावतीने आगामी काळात  पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता कास पठारावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक, कचरा कुंड्या, टोलनाका उभारण्यासाठी पूर्वतयारी सुरू झाली आहे. 

कास पठारावर विविध रानफुले उमलू लागली आहेत. त्यामुळे लवकरच कास पठारावर फुलांच्या रंगछटा पहावयास मिळणार आहेत. कास पठार हे जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित झाल्यानंतर त्याचा  नावलौकिक देशासह परदेशात पोहोचला आहे. दरवर्षी पठारावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे  संयुक्त वनव्यवस्थापन समिती व वनविभागामार्फत कास पठारावर पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.

पठारावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. बॅरेकटस, टोल बुथची उभारणी करण्यात येत आहे तसेच संयुक्त वनव्यवस्थापन समितीमार्फत ठिकठिकाणी कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. यावर्षीपासून पठारावर होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता सुमारे 11 हूून अधिक वॉकीटॉकीद्वारे कर्मचारी एकमेकांशी संवाद साधणार आहेत. शिवाय सातारा शहरातून कासकडे मोठ्या प्रमाणात पर्यटक जात असतात. त्यामुळे शहरात शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी  वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे यावर्षीपासून कास पठाराकडे जाणार्‍या पर्यटकांना आता शेंद्रे मार्गे बोगद्यातून कासकडे जावे लागणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.