Mon, Jun 17, 2019 04:59होमपेज › Satara › अमित शहा असो वा कुणीही उन्मत्त नको

अमित शहा असो वा कुणीही उन्मत्त नको

Published On: Apr 08 2018 2:19AM | Last Updated: Apr 07 2018 11:22PMसातारा : प्रतिनिधी

लोकसभेप्रमाणेच विधानसभेचाही हा मतदारसंघ असल्याने कार्यक्रमाला आमदारांनी यायला हवं होतं. राजकारणात ईष्यार्र् न करता समाजकारण केलं पाहिजे.  आमचा वाद हा तात्विक मुद्द्यांचा आहे. राजकारण असो की समाजकारण वयाने मोठ्या असणार्‍या व्यक्‍तींचा मान हा राखला पाहिजे. पण, याचा अर्थ असा नाही की कुणीही काहीही बोलावे. अमित शहा असो वा कुणीही उन्मत्तपणा करू नये, अशा शब्दात खा. श्री. छ. उदयनराजे यांनी फटकारले. दरम्यान, हल्‍लाबोल यात्रेला आपल्या शुभेच्छा आहेत. मात्र, आपल्याला उपस्थित राहता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

सृजल योजनेंतर्गत सातारा नगरपालिकेच्या कास धरण उंची वाढवण्याच्या कामाचा प्रारंभ खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना खा. उदयनराजे म्हणाले, कास धरण उंची वाढवण्याचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी अधिकारी, ठेकेदार तसेच संबंधितांनी प्रयत्न केले पाहिजेत. मी असो किंवा नसो पण हे काम पूर्ण झाले पाहिजे. पण, मी इतक्यात कुठेही जात नाही. मी अजून आहेच. तुम्ही कुणाशीही लढा. पण इषार्र् करु नका. मी आतापर्यंत कामाशीच इर्षा करत आलो आहे. माझा खासदारकीचा मतदासंघ आहे, त्याप्रमाणे आमदारांच्या या मतदारसंघातीलही हे काम आहे. त्यांनी यायला पाहिजे होतं. प्रत्येक ठिकाणी राजकारण करुन चालत नाही. मी नेहमी समाजकारण करतो. काय कमावले कास परिसरातील लोकांनी? कामधंद्यासाठी मुंबईला व अन्य ठिकाणी जावून स्थायिक होण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही. घाटाई देवीच्या कृपेमुळे धरणाची उंची वाढवण्याचे काम होत असल्याचेही  खा. उदयनराजे म्हणाले. 

अमित शहांनी खा.  शरद पवारांवर केलेल्या टीकेबाबत विचारले असता,  अमित शहांनी काय टीका केली हे माहित नाही. पण पवार किंवा कुणीही असो टीका करत असताना तीन बोटे आपल्याकडे असतात, हे लक्षात ठेवले पाहिजे. एखाद्या व्यक्‍तीवर बोलताना विचार करुनच बोलायला हवे. मी कुणीही नाही. मात्र, ‘कॉमन सेन्स’ दुर्मिळ असतो. वयाने मोठ्या असणार्‍या व्यक्‍तीबद्दल आदर ठेवायला हवा. पक्ष-बिक्ष मला माहित नाही. शरद पवार, अमित शहा, नरेंद्र मोदी या व्यक्‍ती वयाने मोठ्या आहेत.  त्यांच्याबद्दल ब्र काढणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की कोणीही काहीही बोलावे. लोकशाहीला आम्ही मानतो पण राजेशाही तुम्ही आणली. लोकशाहीत घराणेशाही तुम्ही आणलीत. शहा असो वा कुणीही उत्मात करु नये, अशा शब्दांत खा. उदयनराजेंनी फटकारले.

कास धरणाच्या कामात पक्षाचे सहकार्य किती? असे विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, पक्षाचा विषय वेगळा आहे. निवडणुका येतात आणि जातात. मी निवडणुकांकडे दुर्लक्ष करतो. पराभव झाल्यानंतरही निवडून आलोच की. पण जे कुणी येतील त्यांना एकच सांगणं आहे. कुणीही मोठ्या फरकाने निवडून यावे पण त्यांनी लोकांची सेवा करावी अन्यथा माझ्याशी गाठ आहे, असा इशारा खा. उदयनराजे यांनी दिला. 

दोन्ही राजांमधील वाद मिटला का? असे विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, माझा कुणाशीही वाद नाही आणि नव्हता.  माझा वाद तत्वाशी होता. पांढर्‍याला काळं कसं म्हणायचं? माझ्या माफक अपेक्षा होत्या. ज्या राजघराण्यात जन्माला आलो त्या राजघराण्याने लोकांची सेवा करावी, असेही  खा. उदयनराजे यांनी स्पष्ट केले. 

हल्‍लाबोल यात्रेस उपस्थित राहणार का? असे विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, ज्यांनी शिवचरित्र घरोघरी पोहोचवले त्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या कार्यक्रमास गेले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी करतायंत ते ठिक आहे. त्यांच्या हल्‍लाबोल यात्रेस शुभेच्छा असल्याचे उदयनराजेंनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, अ‍ॅड. डी. जी. बनकर, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, नगरसेवक किशोर शिंदे, अशोक सावंत आदि उपस्थित होते. 

Tags : satara, satara news, Kaas dam Height, Increasing, Start work, Udayanraje Bhosale,