Sat, Jul 20, 2019 23:44होमपेज › Satara › दै. ‘पुढारी’ने उठवला होता आवाज 

नाणेगावातील गरिबांना न्याय

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 24 2017 10:31PM

बुकमार्क करा

चाफळ : वार्ताहर

नाणेगाव (ता. पाटण) येथील सर्वसामान्य जनतेवर होणार्‍या अन्यायाविरूद्ध आवाज उठवल्यानंतर ग्रामसभा घेत गरिबांच्या वस्तीत नळ कनेक्शनसह रस्ता करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. त्यामुळेच दै. ‘पुढारी’मुळे न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

नाणेगांव (ता. पाटण) येथे गरिबांच्या वस्तीत एकच नळकनेक्शन आहे. चांगला रस्ताही नाही. त्याचवेळी गावात मात्र चौकाचौकात सिमेंट काँक्रीटचे रस्ते आणि प्रत्येकी 20 फुटांवर नळ कनेक्शन आहे. त्यामुळे गरिबांच्या वस्तीवर अन्याय होत असल्याबाबतचे वृत्त दै. पुढारीने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केले होते.

या वृत्तानंतर खडबडून जागे झालेल्या नाणेगाव ग्रामपंचायतीने तातडीने या विषयावर ग्रामसभेचे आयोजन केले होते. या सभेत गरिबांच्या वस्तीत जादा नळ कनेक्शन जोडण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. त्याचबरोबर चांगला रस्ता करण्याचे निश्‍चित करत सरपंच धनाजी पाटील यांच्या उपस्थितीत याबाबतचा ठरावही घेण्यात आला.

गेल्या अनेक दिवसांपासून दलित वस्तीत एकच नळकनेक्शन होते. त्या कनेक्शनलाही जागोजागी गळती लागली होती. पाईपशेजारी खड्डा काढून खराब पाणी भरावे लागत होते. या सर्व समस्यांपासून आता लवकरच गरिबांची सुटका होणार आहे. त्यामुळेच ग्रामस्थांकडून दै. पुढारीला धन्यवाद देण्यात येत आहेत. त्याचबरोबर ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.