Wed, Jun 26, 2019 11:41



होमपेज › Satara › पत्रकारिता हाच आता देशातील सर्वोच्च स्तंभ 

पत्रकारिता हाच आता देशातील सर्वोच्च स्तंभ 

Published On: May 03 2018 1:32AM | Last Updated: May 02 2018 11:37PM



सातारा : प्रतिनिधी

देशातील पत्रकारिता क्षेत्रात आज भीतीचे वातावरण असतानाही लढावू पत्रकार आपला बाणा आजही टिकवून आहेत. मुख्य न्यायाधीश ऐकत नाहीत म्हणून अन्य न्यायाधीश पत्रकारांकडेच जातात. सरकार ऐकत नाही म्हणून आम्हा विरोधकांना पत्रकारांकडेच यावे लागते. मंत्री येतात आणि जातात. मात्र, पत्रकार आहे त्याच ठिकाणी असतात.  समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची ताकद पत्रकारांमध्येच आहे,  त्यामुळे या देशात पत्रकारिता हाच आता सर्वोच्च  स्तंभ आहे, असे गौरवोद‍्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी काढले. दरम्यान, खचाखच भरलेल्या सभागृहाच्या साक्षीने दै.‘पुढारी’चे वृत्त संपादक हरीष पाटणे यांच्यासह राज्यभरातील 19 पत्रकारांना ‘दर्पण’ पुरस्काराने गौरवण्यात आले. 

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे मराठी वृत्‍तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ रौप्य महोत्सवी दर्पण पुरस्कार वितरण समारंभ पुण्यातील पत्रकार भवनात  संपन्‍न झाला.  त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्‍वजीत कदम,  संत साहित्याचे गाढे अभ्यासक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ, विश्‍वस्त सुभाषराव शिंदे, विजय मांडके प्रमुख उपस्थित होते.  

आ. जयंत पाटील म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर,  राजा राममोहन रॉय, लोकमान्य टिळक अशी देशातील आणि राज्यातील पत्रकारितेची परंपरा आहे. समाजाच्या बाजूने लिहिणारी पत्रकारिता टिकली पाहिजे. तळागाळातून आलेले अनेकजण पत्रकारितेत  आहेत. त्यामुळे असे पत्रकार भयभीत वातावरणाला भीक घालणार नाहीत. पत्रकारिता हा प्रखरपणे बाजू मांडणार्‍या लढणार्‍यांचा पेशा आहे. राजकारणीही पत्रकारांना घाबरतात. आपल्यासारखे काय छापून आले आहे यापेक्षा विरोधात काय छापले याचीच उत्सुकता त्यांना असते. 

आ. पाटील पुढे म्हणाले, महिला पत्रकारांशी असभ्य वागणे, त्यांना नक्षली ठरवणे असा अनुभव अलिकडे येवू लागला आहे. वर्ल्ड प्रेस फ्रिडमच्या अहवालानुसार अशा घटनांमध्ये देशाचा 136 वा क्रमांक लागला आहे. मनमोहन सिंग सरकारच्या काळात हा क्रमांक 133 वा होता. अफगाण तसेच पॅलेस्टाईन या देशांपेक्षा भारत गेल्या चार वर्षात वरच्या क्रमांकावर जावून पोहोचला आहे. जे दिसले ते लिहू शकतो, बोलू शकतो, असे वातावरण आता देशात नाही. आताच्या सरकारच्या काळात 54 हल्‍ले पत्रकारांवर झाले असून त्यातील 8 हल्‍ले राजकीय पक्षांनी केल्याचा दि पोर्टल विदाऊट बॉर्डरचा अहवाल सांगतो.  मोदींच्याच काळात पत्रकारांना सर्वात जास्त धोका निर्माण झाला आहे, असेही ते म्हणाले. 

डॉ. विश्‍वजीत कदम म्हणाले, राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप वाढत असल्याने पत्रकारांनी चळवळ उभी करावी. भारती विद्यापीठातर्फे माध्यमांसाठी बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने नवा अभ्यासक्रम तयार करण्याचा गांभीर्याने विचार केला जाईल. 

प्रा. सदानंद मोरे म्हणाले, संयुक्‍त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत वृत्‍तपत्रांचे योगदान मोलाचे आहे. कायद्याच्या कसोटीत टिकणारी शैली पत्रकारांनी आत्मसात करुन चुकीच्या गोष्टींवर प्रहार केला पाहिजे.

सत्काराला उत्‍तर देताना हरीष पाटणे म्हणाले, धोम-बलकवडी कालव्यात जाणार्‍या गरीब शेतकर्‍यांच्या जमिनी वाचवण्यासाठी मी पत्रकार झालो आणि पत्रकारितेत स्थिरावलो. सर्वसामान्य तसेच शेतकर्‍यांचा आवाज असणार्‍या वृत्‍तपत्रात सर्वसामान्यांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचे काम करत आहे. त्यामुळे हे शस्त्र ज्यांनी माझ्या हाती दिले ते ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री सन्माननीय डॉ. प्रतापसिंह जाधवसाहेब यांना हा पुरस्कार  विनम्रपणे कृतज्ञतापूर्वक अर्पण करत आहे, अशा शब्दांत हरीष पाटणे यांनी भावना व्यक्‍त केल्या.

यावेळी पत्रकार सुकृत खांडेकर यांनीही मनोगत व्यक्‍त केले. यावेळी पुरस्कारप्राप्त हरीष पाटणे, वासुदेव कुलकर्णी, दत्‍ता मर्ढेकर तसेच राज्यातील  पत्रकारांना दर्पण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. प्रास्तविक रवींद्र बेडकिहाळ यांनी केले. सूत्रसंचलन वि. द. पिंगळे यांनी केले. विजय मांडके यांनी आभार मानले. कार्यक्रमास राज्यभरातून विशेषत: सातारा जिल्ह्यातून विविध मान्यवरांची उपस्थिती होती. 

Tags : satara, satara news, Journalism, highest pillar,