Tue, Jul 23, 2019 17:30होमपेज › Satara › ग्रामीण भागातही ‘जीम’ फिव्हर

ग्रामीण भागातही ‘जीम’ फिव्हर

Published On: Dec 18 2017 2:43AM | Last Updated: Dec 17 2017 9:14PM

बुकमार्क करा

परळी : सोमनाथ राऊत

व्यायामशाळा आरोग्यासाठी मंदिर असते तसेच योगा म्हणजे निरोगी आयुष्यासाठी संजीवनी आहे. व्यायामाचा श्री गणेशा करण्यासाठी हिवाळा हा ऋतू उत्तम समजला जात असल्याने शहरासह ग्रामीण भागातील तरुण व्यायामशाळांकडे जाताना दिसत आहेत.यामुळे ग्रामीण भागातही जीमचा फिव्हर वाढत आहे.

शहरात सध्या 25 ते 30 पेक्षा अधिक जीम आहेत. तसेच अनेक योगावर्ग आहेत. सुदृढ आणि निरोगी शरीर कमविण्यासाठी हिवाळा हा उत्तम ऋतू म्हणून ओळखला जातो. काहीजण शरीरयष्टी बनविण्यासाठी तर काही जण वजन कमी करुन केवळ फिट राहण्यासाठी व्यायाम सुरु करताना दिसत आहेत. यामुळे आरोग्य आणि फिटनेसविषयी सजग असलेल्या तरुणाईची पावले जीमकडे व योगा क्लासकडे वळू लागली आहेत.

हिवाळ्यात उत्साहापोटी जीमला जाणार्‍यांची संख्या अधिक असते. मात्र, ती कायम टिकवणे कठीण जाते. थोडे दिवस काही तरुण व तरुणी न चुकता रोज जीममध्ये हजेरी लावतात. परंतु, काही दिवसानंतर सोडून देतात. व्यायाम करताना विशेष लक्ष देवून तो करणे गरजेचे असते. अनेक तरुण उत्साहापोटी पध्दतीच्या विरोधात जाऊन व्यायाम करतात. त्यामुळे त्यांना दुखापत होण्याची शक्यता असते. यासाठी ठराविक पध्दतीनुसार व्यायाम करणे गरजेचे असते.

प्रत्येकाच्या शरिरयष्टीनुसार वेगळा व्यायाम प्रकार असतो. जीममध्ये वजन कमी करण्यासाठी आणि वजन वाढविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम असतात. व्यायाम सुरु करण्यापूर्वी शारिरीक स्थिती, आजार यांचा विचार करणे महत्वाचे ठरते. याचाच विचार करून धकाधकीच्या जीवनात जीमला जाणे शक्य नसल्याने स्वत:साठी 20 ते 25 मिनिटे काढून घरी हलक्या प्रकारचे व्यायाम करु लागले आहेत.

पावसाळ्यात कमकुवत झालेली पचनशक्ती हिवाळ्यात सुधारु लागल्याने या ऋतूमध्ये जास्त भूक लागते. त्यामुळे या काळात केलेला व्यायाम शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरत असल्याने जीमला जाणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे योग कार्यशाळा व जीममध्ये गर्दी झालेली दिसून येत आहे.